
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ – महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम (MGIMS) आणि उम्मीद बाल विकास केंद्र, मुंबई (UMMEED) यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, झरी, पांढरकवडा, बाभुळगाव, घाटंजी या तालुक्यांमध्ये आरोग्य विभागाच्या मदतीने बाल विकास सहाय्यक (CDA) हा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत विकासात विलंब व विविध विकलांगता असलेल्या बालकांच्या पालकांना मार्गदर्शन करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रत्येक उपकेंद्र स्तरावर अश्या बालकांच्या पालकांचे गट तयार करून त्यांच्या नियमित बैठकी घेण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी राळेगाव तालुक्याने पुढाकार घेत तालुक्यातील धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आष्टा उपकेंद्रात पहिल्या ‘एकता ग्रूपची’ सुरूवात करण्यात आली. यासाठी या उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रतनदीप मारुती सिडाम आणि परिचारिका वैशाली कठाने यांनी पुढाकार घेत उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील पाच पालकांना त्यांच्या बालकांसह या बैठकीकरीता आमंत्रित केले. उपस्थित पालकांशी संवाद साधल्यानंतर या बालकांना प्रामुख्याने बोलीभाषा, स्थूल हालचालींमध्ये अडचणी तसेच अतिरिक्त आधाराची गरज असल्याचे निदर्शनास आले. या गटाला डॉ. रत्नदीप व परिचारिका वैशाली यांनी मार्गदर्शन केले. पालकांनी एकमेकांचे अनुभव मांडले व ज्यातून त्यांना परस्पर शिक्षणाची संधी मिळाली. या माध्यमातून पालकांना आपल्या मुलांच्या दैनंदिन जीवनातील विकासाला सहाय्य करण्याचे महत्त्वपूर्ण मार्ग समजून घेता आले. सदर कार्यक्रमाकरीता डॉ. कपिल गोटे तालुका आरोग्य अधिकारी राळेगाव आणि डॉ. जयपाल पाटील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा यांच्यासह एकात्मिक बालविकास विभागातील धानोरा सर्कलच्या पर्यवेक्षिका धरती कोराम व अंगणवाडी सेविका कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
