
सहसंपादक: रामभाऊ भोयर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेली मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना ही स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांच्या आयुष्यात दीर्घकालीन व शाश्वत परिणाम करणारी कदाचित पहिलीच क्रांतिकारी योजना असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुलसिंह चौहाण यांनी व्यक्त केले.
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, राळेगाव येथे आमदार व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकराव ऊईके यांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पांदण रस्त्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
ॲड. प्रफुलसिंह चौहाण म्हणाले की, पांदण रस्ते म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाण्याचा प्राणवायू आहे. पांदण रस्त्यांमुळे जमिनीचे मोल वाढते, उत्पादन क्षमता वाढते, शेतीत शेतकऱ्यांचे मन रमते, बैलगाडी व ट्रॅक्टर थेट शेतात पोहोचतो. डोक्यावर ओझे घेऊन जाण्याची वेळ आता संपणार असून दुसऱ्याच्या शेतातून जाण्यावरून होणारे वादही कायमचे थांबणार आहेत.यावेळी बोलताना आमदार व मंत्री डॉ. अशोकराव ऊईके यांनी सांगितले की, आपल्या मतदारसंघात जवळपास तीन हजार पांदण रस्ते आहेत. शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत या सर्व रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देण्याची प्रक्रिया मागील ४५ दिवसांत पूर्ण करण्यात आली असून सर्व ग्रामसभांचे ठरावही पारित झाले आहेत. या योजनेसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“प्रशासन आणि शासन यांनी हातात हात घालून एक ठाम संकल्प केला आहे की, यापुढे कोणत्याही शेतकऱ्याला दुसऱ्याच्या शेतातून डोक्यावर ओझे घेऊन घाम गाळावा लागणार नाही. पुढील पाच वर्षांत प्रत्येक शेतकऱ्याचा पांदण रस्ता खडीकरण झालेला असेल,” असे ठाम प्रतिपादन ॲड. प्रफुलसिंह चौहाण यांनी केले.या पत्रकार परिषदेला आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोकराव ऊईके, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुलसिंह चौहाण, तालुका अध्यक्ष सौ. छायाताई पिंपरे, शहर अध्यक्ष शुभम मुके, कैलास बोंद्रे, प्रवीण कोकाटे, प्रशांत तायडे, बबनराव भोंगारे, डॉ. कुणाल भोयर, राजू गुंदेचा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.ही योजना केवळ रस्ता नसून शेतकऱ्यांच्या भविष्याकडे जाणारा विश्वासाचा मार्ग आहे, असे मत यावेळी सर्वच उपस्थितांनी व्यक्त केले.
