
(मनसेच्या वतीने ५८ दिवस पुरेल एवढा धान्य साठा सुपूर्द!
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष, ‘मराठी हृदयसम्राट’ राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने एक स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला. कळंब तालुक्यातील धोत्रा येथील वृद्धाश्रमात अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात राजसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता, समाजातील उपेक्षित आणि वयोवृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून मनसे सैनिकांनी हा दिवस संस्मरणीय केला.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धोत्रा येथील वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी उपस्थित वृद्धांनी राजसाहेबांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करत मनापासून आशीर्वाद दिले. याप्रसंगी मनसेच्या वतीने वृद्धाश्रमातील सर्व आजी-आजोबांना अत्यंत आदराने मिष्ठान्न भोजन (गोड जेवण) देण्यात आले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी वयाची ५७ वर्षे पूर्ण करून ५८ व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून, वृद्धाश्रमाला ५८ दिवस म्हणजेच तब्बल दोन महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा* भेट देण्यात आला. यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल यांसह संपूर्ण किराणा सामान आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. मनसेच्या या अनोख्या आणि उपयुक्त भेटीमुळे वृद्धाश्रम व्यवस्थापनाने व तेथील वृद्धांनी मनसे सैनिकांचे विशेष आभार मानले.
हा कौतुकास्पद उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट,तालुका संघटक (राळेगाव) स्वप्निल नेहारे, उपाध्यक्ष सचिन आत्राम, बाभूळगांव तालुकाध्यक्ष सागर झपाटे, उपाध्यक्ष श्रेयश पांडे, कळंब तालुकाध्यक्ष गौरव राऊत, संघटक अक्षय पारिसे यांच्यासोबतच ओम मडावी, सुहास उमाटे, तुषार वाघमारे, मोहित तिवाडे, यश थुल, सुजल कुडसंगे, आशिष वाघमारे, दर्शन जाधव, रोशन पायघन, प्रमोद टोंगे आणि परिसरातील असंख्य महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय जल्लोषाला बाजूला सारून मनसे कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या सामाजिक जाणीवेचे राळेगाव आणि कळंब तालुक्यात सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
