
सहसंपादक : रामभाऊ भोयर
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी, तालुका कृषि अधिकारी दीपाली खवले यांच्या उपस्थितीत मौजे हिवरी येथील शेतकरी श्री. रमेश वासुदेव कळसकर यांच्या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत १ हेक्टर क्षेत्रावर चिकू फळपीकाची लागवड करण्यात आली.दरम्यान हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित सीआरए फळबाग लागवड तंत्रज्ञाना बद्दल माहिती देउन प्रात्यक्षिक घेण्यात आले . या तंत्रज्ञानामुळे मुळांना थेट अन्नद्रव्ये आणि पाण्याचा पुरवठा होतो. माळमाथा व दुष्काळी भागांमध्ये हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकते, असे प्रतिपादन दीपाली खवले यांनी केले .
सीआरए तंत्रज्ञान म्हणजे काय याबद्दल तांत्रिक माहिती सहाय्यक कृषि अधिकारी तुषार मेश्राम यांनी दिली.
यात २ बाय २ रुंद आणि २ फूट खोलीचा खड्डा तयार केला जातो. त्यात गांडूळ खत, ट्रायकोडर्मा, शेणखत आणि वाळू वापरून शास्त्रशुद्ध पद्धतीने रोपांची लागवड करण्यात येते. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यात ३ फूट उंचीचे पीव्हीसी पाइप उभे केले जातात, त्यात अन्नद्रव्य व पाणी सोडण्याची व्यवस्था तयार करण्यात येते. परिणामी, थेट मुळांना पाणी व खते पोहोचवता येतात. त्यामुळे मुळांना योग्य अन्नद्रव्य मिळून झाडांचे उत्पादन व आरोग्य वाढते. तालुक्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि शाश्वत सिंचनासाठी शासनामार्फत विविध योजनेअंतर्गत संधी उपलब्ध झाली आहे. आधुनिक शेतीकडे वाटचाल करत शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी तालुक्यातील हवामान व मातीचे पोत फळबाग लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी तालुका कृषि अधिकारी दीपाली खवले यांनी केले आहे. तसेच कपाशी पिकाचे सर्वेक्षण करत असता क्रायसोपा व लेडीबड बिटल या मित्र किडींची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली.मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान असतात. ते किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहतात. किंवा किडींच्या शरीरामध्ये, शरीरावर अंडी घालून तिला हळूहळू खातात. क्रायसोपा: मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे,पिठ्या ठेकुण, किडी व अंड्याचे भक्षण करते. एका दिवसात एक क्रायसोपा ४६ शत्रू किडी व अंडी खाते. तर लेडी बर्ड बिटल: प्रौढ भुंगे व त्याच्या अळ्या मावा व तुडतुडे, फुलकिडे या किडी खातात. एक लेडी बर्ड बिटल प्रति दिवस ४० ते ५० मावा खाते, त्याच्या जीवनक्रमात पाच हजार मावा किडी खाते.शेतकऱ्यांनी मित्र किडींचे संवर्धन करावे असा संदेश देणात आला.व फवारणी करताना कशी काळजी घ्यावी या बाबत कृषि सेवक सनद घोसळकर यांनी माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले . यावेळी ,शेतकरी रमेश कळसकर,गणेश कळसकर, प्रदीप नगराळे, गणेश कोवे व आदी शेतकरी उपस्थिती होते.
