
(प्रतिनिधी) शेख रमजान
बिटरगांव बु. येथे गेल्या काही काळापासून अवैध दारू विक्रीने उच्छाद मांडला असून, याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील महिला आणि संतप्त नागरिकांनी थेट ठाणेदारांना निवेदन देऊन या बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिटरगांव बु. ग्रामपंचायतीने १० वर्षांपूर्वीच गावात दारूबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. असे असतानाही, गावात राजरोसपणे दारूची विक्री सुरू आहे. “गावात दारू येतेच कशी? आणि पोलिसांना याची खबर नाही कशी ?” असा संतप्त सवाल महिला मंडळाने उपस्थित केला आहे. पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे अवैध धंदे सुरू राहणे अशक्य ? असल्याची चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी मंदिर आणि शाळा आहे, त्याच परिसरात दारूची दुकाने थाटली गेली आहेत. शासनाचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या विक्रीमुळे, कोवळ्या वयातील मुलांवर वाईट संस्कार होत आहेत. “शाळेसमोर दारू विकली जात असेल, तर पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे?” असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे.
गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना आणि महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत असताना, बिटरगांव पोलीस याकडे गांभीर्याने का पाहत नाहीत? कोणाच्या आदेशाने ही विक्री सुरू आहे ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बिटरगांवच्या महिलांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनाही पाठवण्यात आल्या असून, आता वरिष्ठ प्रशासन या ‘झोपलेल्या’ पोलीस यंत्रणेला जागे करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
