


राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगी येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक चक्क व्होटिंग मशीनवर घेण्यात आली. शाळेची 49 विद्यार्थी संख्या असून, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी तसेच हक्कांची कर्तव्याची जाणीव जागृत ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.मुख्यमंत्री पदासाठी पाच विद्यार्थी रिंगणात होते. मतदान अधिकाऱ्याची भूमिका विद्यार्थ्यांनीच पार पाडली. 49 म्हणजे 100 टक्के मतदान झाले. विद्यार्थी मतदान अधिकाऱ्यांनी ईव्हीएम व इतर निवडणूक साहित्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केले.
नंतर निकालासाठी रिझल्ट बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार करण्यात आला. 49 पैकी सर्वाधिक 26 मते घेत यज्ञा संजय डाहुले या चौथीच्या विद्यार्थीनीने मुख्यमंत्रीपदी बाजी मारली . क्रिश किशोर राजगडे याने 6 मते घेत उपमुख्यमंत्री पद पटकावले. निकाल येताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी पार पाडल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेचे ज्ञान मिळाले . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंढरी रोगे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पेटकर, मंगेश कोवळे यांनी सुध्दा शालेय मंत्रीमंडळ निवडणूकीत भाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख श्री. सुरेश कुंभलकर यांनी शुभेच्छा दिल्या.
