गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरुन देशाची पारख होते. “गावाची होणारी अवदसा, येईल देशा”, असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंतांनी दिलेला हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणला ते म्हणजे यवतमाळ जिल्हातील दिग्रस तालुक्यातील मांडवा या ग्रामपंचायतने….!
महानगरपालिका असो, नगरपालिका असो की मग गाव खेडे तेथील रहिवासी लोकांना संपत्ती कर व इतर कर भरावी लागते. यामध्ये काही जण नियमीत पाणी कर भरणा करित असतात. तर काही लोक वर्षानुवर्षे थकीत राहतात किंवा कर भरतच नाही. मात्र योजना आल्यानंतर या दोहोंमध्ये भेदभाव करता येत नाही. किंबहूना गाव खेड्याच्या भानगडी टाळण्यासाठी अशा अटी घालण्यात येत नाही. मात्र जे नागरिक नियमीत कर भरतात आणी आपल्या गावांच्या ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये हातभार लावु इच्छीतात, अशा लोकांना त्यांचा या प्रामाणीकपणाचा काही ना काही परतावा मिळायला पाहिजे. आणि जे नागरिक थकीतदार आहे. त्यांनाही कर भरण्यासाठी प्रेरित करता यावे, अशी काही संकल्पना क्वचित ठिकाणी राबविल्याचे दिसुन येते.
मात्र यवतमाळ जिल्हातील दिग्रस तालुक्यातील मांडवा या ग्रामपंचायतीच्या माध्यमांतून आगळीवेगळी योजना राबवण्यात येत आहे. सदर ग्रामपंचायतने गावामध्ये एक आगळावेगळा प्रयोग केला असुन गावातील जे लोक नियमीत कर भरतात, अशा लोकांना आर.ओ. चे शुद्ध पिण्याचे पाणी आणी त्यांच्या कुटुंबियांना लागणारे दळण अगदी मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळे करदात्या नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तर या आगळ्या वेगळ्या संकल्पनेची सर्वत्र चर्चा देखील सूरु आहे. करदात्यासाठी हा रिटर्न गिफ्ट देण्याचा आगळावेगळा प्रयोग करणारी मांडवा ही एकमेव ग्रामपंचायत असू शकते. गावातील अनेकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे.
चौकट
‘भौतिक सुविधेसह विकासाला प्राधान्य’
मांडवा – लायगव्हाण गट ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करुण भौतिक सुविधासह ग्राम विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. स्ट्रीट लाइट, नविन पाणी पुरवठा करणारी नळ योजना, नविन पाण्याची टाकी, वैयक्तिक नळ कनेक्शन, दलित वस्तीमधील काही भागात नाली आणि पेवर ब्लॉकचे काम झाले आहे तर मांडवा येथे मोफत दळण व शुद्ध पिण्याचे आरओचे पाणी सुरू आहे. भविष्यात असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत राहू.
– सौ. मनिषा यादव गावंडे – सरपंच, मांडवा
‘जाहीरनाम्यात दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न’
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही दिलेले वचन टप्प्याटप्प्याने गावात विकासकामे सुरू आहेत. गावातील नाल्या अंतर्गत रस्ते, गुरांकरिता पिण्याच्या पाण्याची सुविधा टाके, स्मशानभूमीचा विकास, असे अनेक विकासकामे सुरू आहे. तर यापुढे ही विकास कामे सुरूच राहणार.
– यादव पवार, शिवसेना तालुका प्रमुख