यवतमाळ -वाशीम मतदार संघात जय पराजयाचा ‘ अंदाज अपना -अपना ‘ ( राळेगाव मध्ये सर्वाधीक यवतमाळ मध्ये सर्वात कमी,) विधानसभेत कुणाला डच्चू?

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात सर्वात अधिक 68.96 टक्के मतदान राळेगाव विधानसभा क्षेत्रात झाले. सर्वात कमी मतदानाची टक्केवारी ही यवतमाळ विधानसभा क्षेत्रात 59.46 टक्के नोंदल्यागेली. निकालाला अजून अवधी असला तरी ‘ अंदाज अपना अपना ‘ ला चांगलेच उधान आले आहे. त्यातच सोशल मीडियावर नानाविध सर्व्हे , सट्टा बाजारादी खरे -खोटे निष्कर्ष धडाधड आदळू लागल्याने माहोल चांगलाच खुशनुमा झाल्याचे दिसते,त्यातच भाजपा ने 2019 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 303 खासदारा पैकी 115 हुन अधिक खासदारांची तिकिटे कापली. देशभरात 33 टक्के जागावर नवीन उमेदवार दिले. लोकसभेच्या निकालानुरूप याची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होणार असल्याची अटकळ बांधल्या जात आहे.जिल्ह्यातील आमदारात या लिस्ट मध्ये आपले नाव यायला नको ही धाकधूक या मुळे वाढली.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातील विधानसभेवर भाजपा ची निर्विवाद पकड आहे. पालकमंत्री महायुती मधील घटकपक्षाचे असल्याने जिल्ह्यातील सारी सत्ताकेंद्रे भाजपा च्या अवती -भोवती एकवटलेली दिसतात.सर्वत्र विध्यमान आमदार विराजमान असल्यानेच महायुतीच्या नेत्यांनी भावना गवळी यांना डावलून वेळेवर राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा धाडसी निर्णय घेतला.हा निर्णय घेतला तेव्हाच राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील या आमदारांवर सोपवली. हवे ते,वाट्टेल ते मागीतले त्या प्रमाणात दिले. मात्र रिझल्ट न दिल्यास काय होईल याचा अप्रत्यक्ष इशारा देखील त्याच वेळी दिल्याची माहिती आहे. निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सढळ हस्ते रसद पुरवली, स्वतः हेमंत पाटील यांची कुमक पोहचली त्या सोबत भाजपा ची रसद आली ती वेगळी अशी चहू बाजूनीं मदतीचा झरा वाहत होता आणि त्याची संततधार आमदारांच्या पदरात पडत होती. त्या -त्या विधानसभा क्षेत्रातले नियोजन त्या -त्या आमदारांकडे दिल्या गेले होते. यातच मोठा गेम झाल्याची माहिती आता सार्वजनिक होऊ लागली आहे. काही आमदारांनी व त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी मिळालेली रसद स्वतःच गडप केली. महायुतीच्या घटक पक्षाला वाऱ्यावर सोडले . पुढच्या निवडणुकांची तरतूद म्हणून आपले खिसे भरले असा आरोप होऊ लागला आहे.
निवडणुकीच्या धामधूमीत लुटा…, पळा,… पळा… लुटा अशी अहमहनिका लागली होती याचे अनेक मजेशीर किस्से बाहेर येऊ लागले आहे. यात मोठे तेव्हढे खोटे याचा प्रत्यय देखील आला.यवतमाळ मधील एक बडा नेता ज्याच्या गाठीला गल्ली पासुन तर दिल्ली पर्यंत पदेच पदे जो मिरवतो, 25 पेट्या् बाहेर पाऊस आहे म्हणून याच्या कडे रात्री पुरत्या सोपवल्या याने त्याचा ब्यांन्नव केला. हे एक प्रातिनिधीक उदाहरण झाले अनेकांनी या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. आता रिझल्ट भेटला नाही तर त्याची शिक्षा म्हणून उमेदवारीच भेटते की नाही अशी चिंता आमदारांच्या मनात निर्माण झाल्याची चर्चा आहे.
ज्या विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या उमेदवाराला कमी मताधीक्य राहील त्या क्षेत्रातील आमदाराला डचु देण्याचे नियोजन वरिष्ठ पातळीवर ठरल्याची माहिती आहे. कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणी काय काय कारनामे केले याची माहिती घेण्याचे काम भाजपा सेल ने सुरु केल्याची माहिती आहे. याला दुसरी किनार आहे ती अँटी ईनकंबन्शी टाळणे ही. तेच तेच चेहरे एलर्जीकल होतात. नवा चेहरा दिल्यास सकारात्मक बदल होतो ही भाजपाची रणनीती आहे. लोकसभेची आकडेवारी पाहिल्यास दर तीन पैकी एका खासदाराला पुन्हा तिकीट मिळालेले नाही. एकूण उमेदवारांची आकडेवारी सांगायची झाल्यास 33 टक्के जणांना भाजपाने घरी बसवले. महाराष्ट्रात 23 पैकी सहा विध्यमान खासदारांना डचू देण्यात आला. पक्ष संघटनेची ताकद एव्हडी आहे की या विरुद्ध कुणी ब्र देखील काढला नाही.ज्या विधानसभा क्षेत्रात पंधरा हजारच्या वर लीड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असेल त्या विधानसभा मतदार संघतील आमदाराला निश्चित घरी बसवले जाईल अशी माहिती आहे. सोबतच या पेक्षा कमी मताधीक्य जरी महायुतीच्या उमेदवाराला राहिले व त्याच्या विरुद्ध मित्र पक्षाच्या तक्रारी असल्यास त्याला ही घरी बसवले जाईल अशी चर्चा आहे. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात राळेगाव विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त मतदान व यवतमाळ विधानसभा मतदार संघात सर्वात कमी मतदान ही टक्केवारी कुणाच्या उमेदवारीवर कुऱ्हाड कोसळवनार व कुणाला तारणार याच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.