खैरी कन्या शाळेसमोरील दवाखान्याची जीर्ण इमारत देत आहे विद्यार्थ्यांच्या अपघाताला निमंत्रण ?(प्रशासन निद्रा अवस्थेत ): प्रशासनाला सूचना करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातील कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये वाट कठीण दिसत आहे कारण पाठीवर दप्तर आणि हातात पाण्याची बॉटल व पावसात छत्री, या वस्तू सांभाळत शाळेत जाताना चिखल तुडवत मार्ग काढावा लागतो. अशातच पाय घसरून पडल्यास घरी परत जाण्याशिवाय पर्याय नाही. दुखापत झाल्यास दवाखान्याची वाट धरावी लागते तसेच या कन्या शाळेसमोर जुना सरकारी दवाखाना हा जीर्ण अवस्थेत उभा असून त्याची इमारत केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही असे गंभीर चित्र खैरी येथील एक ते चार वर्ग भरणाऱ्या कन्या शाळेचे आहे. ही दवाखान्याची इमारत केव्हा पडेल याची शाश्वती नाही. दवाखान्याची इमारत शालेय वेळेत कोसळल्यास लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. याची प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही आजपर्यंत ही इमारत प्रशासनाने पाडली नाही मात्र यामुळे एखाद्या विद्यार्थ्यास जीवित हानी झाल्यास किंवा जखम झाल्यास प्रशासन जबाबदारी घेईल का हा मोठा यक्ष प्रश्न आहे. ह्या प्रकरणाची ग्रामपंचायत आरोग्य विभाग व रायगाव तालुका प्रशासनाला माहिती दिली असूनही याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे हे मात्र विशेष.
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मार्ग खूप कठीण आहे. थोड्याशाही पावसाने शाळेचा रस्ता चिखलमय होतो .तसेच कन्या शाळेला लागूनच जुना सरकारी दवाखान्याची इमारत जीर्ण अवस्थेत असून त्या इमारतीच्या अवस्थेमुळे दवाखाना दुसरीकडे वर्ग झाला आहे परंतु इमारती तिथेच असून ती केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. कदाचित शाळेच्या वेळेत कोसळली तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा अपघात घडू शकतो असे वास्तव चित्र आहे. कन्या शाळेसमोरील दवाखान्याची इमारत पडण्याची अवस्थेत असून मात्र ती रीतसर केव्हा पाडली जाईल की एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात घडल्यावर पाडली जाईल हे येणारा काळ सांगेल.
शाळेसमोर असलेल्या चिखलावर चूरी किंवा इतर साहित्य टाकण्यासाठी शाळेला काही जास्त फंड येत नसतो त्यामुळे यावर ग्रामपंचायत प्रशासनाने किंवा पंचायत समिती प्रशासनाने शाळेतील पटांगणात चूरी किंवा इतर सामग्रीचा वापर करून शाळेतील विद्यार्थ्यांना प्रार्थना उभे राहता येईल व खेळता येईल यासाठी शाळेचा परिसर चांगले करून द्यावे. तसेच शाळेसमोरील रस्ता शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जाण्या येण्यास दुरुस्त करावा जेणेकरून विद्यार्थी चिखलात घसरून पडणार नाही. तसेच खास करून शालेय विद्यार्थ्यांचा अपघात किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून शाळेसमोरील दवाखान्याची इमारत जमीन दोस्त करावी अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकाकडून होत आहे. जर विद्यार्थ्यांच्या हानी झाल्यास याप्रकरणी सूचना केलेल्या संबंधित विभागास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विद्यार्थ्यांच्या पालकाकडून मागणी होत आहे. संबंधित विभागाला सूचना करून पाहणी करून अहवाल सुद्धा तयार केला परंतु दोन वर्षापासून त्यावर कुठली कारवाई न झाल्यामुळे खैरी गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे तेव्हा यावर आरोग्य विभाग पंचायत समिती विभाग काय करते याकडे सर्व खैरी गावातील पालक वर्गाचे लक्ष लागले आहे.

शाळेसमोरच भरतो आठवडी बाजार

खैरी येथील आठवडी बाजार शाळेच्या अगदी समोर दर शुक्रवारी भरतो. त्याच दिवशी तेथील स्वच्छता केली जात नाही. शनिवारी सकाळी शाळा असते त्यामुळे रस्त्यावरील घाणीचा व आठवडी बाजारातील कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास विद्यार्थी, शिक्षकांना होतो. शाळेतील विद्यार्थी हे लहान असून ह्या गलिच्छ वातावरणामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे त्यांना गॅस्ट्रो डायरिया यासारख्या रोगांची लागण सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना कराव्या पालक वर्गाकडून मागणी होत आहे.