वरोरा :- वरोरा तालुक्यातील असंख्य स्वस्त धान्य दुकानदारांनी ई – पॉज मशीन मध्ये गेल्या महिन्यापासून धान्य वाटप करताना अडचणी येत असल्याने आज दि. 5 ऑगस्ट रोजी वरोरा तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटना वरोरा चे अध्यक्ष विठ्ठल लेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक दुकानदारांनी तहसीलदार, योगेश बा. कौटकर यांच्या दालनात ई – पॉज मशीन जमा केली.
महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ पुणे दि. 29 जुलै रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या पत्रांमध्ये नवीन मिळालेल्या मशीनमुळे सर्वर मध्ये गेल्या महिन्यापासून धान्य वाटप करताना धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दर दोन दिवसांनी सर्वर डाऊन झाल्याने तर कधी कधी 4 ते 5 दिवस दिलेली मशीन बंद राहते त्यामुळे दुकानदार, कार्डधारक यांच्यामध्ये तू तू- मैं मैं प्रसंगही उद्भवत आहे. राशन कार्ड धारक हे मोलमजुरीला जाण्यासाठी दुकानांमध्ये धान्याची वाट पाहत बसत असतात त्यामुळे अनेक शेतकरी मजूर वर्गाला धान्य तर मिळतच नाही , मात्र शेतमजुराची मजुरी ही बुडल्या जाते. जुलै महिन्यात देण्यात येणारे धान्य अद्यापही अनेक शिधाधारकाना मिळालेले नाही, एवढेच नव्हे तर गोदाम व्यवस्थापकाकडून दुकानदाराकडे धान्य टाकायला घाई करीत असतात पण हे धान्य या ई – पॉज मशीनला ऑनलाइन द्वारा आठ दिवसानंतर जमा केले जाते अशी तक्रारही वरोरा तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटना यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या सर्व अडचणीमुळे सर्व धान्य दुकानदारांनी आज तहसील कार्यालय गाठून ई-पॉज मशीन तहसीलदारांच्या दालनात जमा केली यावेळी संघटनेमार्फत तालुका अध्यक्ष विठ्ठल लेडे, उपाध्यक्ष शेख रसूल शेख शब्बीर, सचिव हेमंत कोंगरे, विमलबाई पुरी, सीमा कन्नमवार वरोरा, महेंद्र गावंडे, चिकणी, इस्तेहाक खा.पठाण नागरी, अविनाश वामन राऊत आजनगाव, डी.एन वाटकर, माढेळी, सेवा संस्था सोईट, उमेश माहुरे, विजय पुरी वरोरा, रमेश शेंडे यांच्यासह एकूण 131 धान्य दुकानदारांनी ई -पॉज मशीन जमा करून प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्याची सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा ठेवली आहे.