
सहसंपादक: रामभाऊ भोयर
शासनाने दिनांक 14 ॲाक्टोंबर 2024 रोजी शासन निर्णय काढुन राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना 1 जून 2024 पासुन वाढीव टप्पा देण्याचा निर्णय घेतला होता परंतु वाढीव टप्प्यासाठी लागणारा निधी जवळपास एक वर्ष या निर्णयाला होत आले तरी मंजूर केला नाही तसेच सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सदरचा निधी मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही मा. मुख्यमंत्र्यांनी दिली होती परंतु या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये सदर वाढीव निधीसाठी कोणत्याही स्वरुपाचा निधी मंजूर न केल्याने राज्यातील जवळपास 60,000 शिक्षक बांधवांमध्ये असंतोष निर्माण झाला व त्यामुळे शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा 8, 9 जुलै रोजी बंद ठेवून सर्व शिक्षक व कर्मचारी दोन दिवस आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्याचे नियोजन केले आणि अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्याने आता राज्यातील सर्व शाळा दिनांक 8 व 9 जुलै रोजी बंद राहणार आहे. आपल्या हक्काच्या वाढीव टप्प्यासाठी समस्त अंशतः अनुदानित बांधवांनी मोठ्यात मोठ्या संख्येने आझाद मैदानावर आपली उपस्थिती दर्शवावी व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांनी या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन यवतमाळ जिल्हा शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सर्वांना करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक समन्वय संघाने शाळा बंदबाबतचे निवेदन सन्माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री रविंद्रजी काटोलकर साहेबांना दिले याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
