
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी १४ ऑगस्ट २०२५ रोजी राळेगाव येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने दुपारी १२ वाजता कापसी वडकी चौक (पेट्रोल पंपाजवळ) येथून पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या राळेगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या मार्फत दिंदोडा प्रकल्पग्रस्तांच्या अधिग्रहित जमिनीबाबत योग्य मोबदला देण्यासाठी २४० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्याची मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली. यापूर्वी “चुल्हा जलाव” आंदोलनाच्या वेळी डॉ. उईके यांनी स्वतः धरणस्थळी येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने २४० कोटींचे पॅकेज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी १८ दिवस सुरू असलेले आंदोलन आश्वासनाच्या आधारे मागे घेण्यात आले होते. मात्र, आजतागायत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त संतप्त आहेत.
मोर्चादरम्यान प्रकल्पग्रस्तांनी पालकमंत्रींना त्यांच्या नैतिक जबाबदारीची जाणीव करून देत, संबंधित प्रस्तावाचा मंजुरी आदेश प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन देण्याची मागणी केली. “आम्ही तुमच्या मतदारसंघातील मतदार असून, धरणग्रस्तांचे पालक म्हणून आमच्या मागण्या मान्य करणे हे तुमचे कर्तव्य आहे” असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला.
मोर्चात मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. घोषणाबाजी, फलक, निदर्शने यांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष व्यक्त करण्यात आला.
