
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धानोरा येथे हरित संदेश देणारा एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, धानोरा येथे शिव शक्ति युवा बहुउद्देशीय संस्था धानोरा, पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण समिती धानोरा तसेच जिल्हा परिषद शाळा धानोरा येथील सर्व कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात विविध प्रकारच्या फळझाडे, सावली देणारी झाडे व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, “आज लावलेले हे रोप उद्याचा हिरवागार वारसा ठरेल,” असा संदेश दिला.
या उपक्रमामुळे शाळा परिसराला हिरवाईची नवी झळाळी मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण जतनाची जाणीव अधिक दृढ होणार आहे.
