
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा, परंपरेचा व लोकसंस्कृतीचा वारसा असलेला पोळा सण यंदा महागाईच्या सावटात साजरा करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे या पारंपरिक सणाचा उत्साह कमी झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतींमध्ये दुपटीने वाढ झाल्याने शेतकरी नाराज आहेत. शहरातील बाजारपेठेत बैलांच्या साजाची दुकाने उघडली असली तरी खरेदीसाठी गर्दी कमी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नव्या साहित्याऐवजी जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारपेठेत मंदीचे वातावरण आहे.
यंदा पावसाच्या लपाछपीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असून, खते व बियाण्यांच्या भाववाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत पिकांची स्थितीही नाजूक आहे.
दोन बैलांची सजावट करताना किमान दोन ते पाच हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने यंदा पोळा सण कसा साजरा करावा, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
