
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरी (ईचोड) येथील एका २५ वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून लग्नासाठी जबरदस्ती केली तसेच तिला आणि तिच्या काकाला मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या काकासह खैरीवरून वणीला जात असताना दापोरा नाल्याजवळ आरोपी राकेश अजय लिचडे (वय २५, रा. बोरी, ईचोड) याने दुचाकी अडवून “तू माझ्याशी लग्न का करत नाहीस” असा सवाल करत पीडितेला मारहाण केली. यावेळी तिच्या काकालाही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मुलीने १८ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात विनयभंग, पोक्सो तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढे सुचनापत्रावर सोडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुखदेव भोरखडे करीत आहेत.
