
सहसंपादक ; रामभाऊ भोयर
ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅक, खोडकिडा आणि मूळकुज यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे हजारो एकरवरील सोयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
तात्काळ पंचनामे: शेतीत झालेल्या नुकसानीचे आणि घरांच्या पडझडीचे तात्काळ व अचूक पंचनामे करण्यात यावेत.
आर्थिक मदत: बाधित शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाईसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.
कृषी विभागाचे सहकार्य: नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी.
या प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून बाधित शेतकरी आणि नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे. या निवेदनाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
यावेळी अमर आत्राम, तुषार वाघमारे, ओम माड़वी, सुहास उमाटे, संदिप गुरूनुले, रोहन वाघ, प्रवीण ओंकार, रोशन गुरूनुले, गजानन बुटे, गणेश भोयर, शरदराव इंगोले, आणी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
