सहसंपादक : रामभाऊ भोयर
मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात राज्यभरात १७ सप्टेंबरपासून होत आहे. या अभियानाची तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प पंचायत समिती प्रशासनाने केला आहे.
अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा असून याची सुरुवात ग्रामसभेतून होणार आहे. राळेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १७ सप्टेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या ग्रामसभेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंचायत समितीकडून करण्यात आले आहे.
या अभियानात वैयक्तिक व सार्वजनिक विकास योजनांबरोबरच ग्रामस्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक विकासाच्या माध्यमातून गावे पर्यावरणदृष्ट्या संतुलित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करून त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार योजनेंतर्गत राज्यस्तरावर प्रथम तीन उत्कृष्ट ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपये; विभाग स्तरावर १ कोटी, ८० लाख व ६० लाख रुपये; जिल्हास्तरावर ५० लाख, ३० लाख व २० लाख रुपये; तर तालुकास्तरावर १५ लाख, १२ लाख व ८ लाख रुपये इतकी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय, दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येईल. ग्रामविकास, स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून गावोगावी समृद्धी घडविण्याचा निर्धार या अभियानातून दिसून येत आहे.
