
बंधाऱ्याशिवाय मतदानाला बहिष्कार, नंदोरी ग्रामस्थांचा आमसभेत ठराव
वरोरा:-
भद्रावती तालुक्यातील नंदोरी गावातील शीर नदीपलीकडील इंदिरानगर वसाहतीतील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सोसत आहेत. इंदिरानगरात तब्बल ६० कुटुंब वास्तव्यास असून, त्यांच्यासह नंदोरी गावातील शेतकऱ्यांची शेतीदेखील नदीपलीकडे आहे. दरवर्षी पुर आला की इंदिरानगरचा रस्ता पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, तर आजारी व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचे जीव धोक्यात येतात.
या पार्श्वभूमीवर शासनाने “चांदा ते बांदा” योजनेअंतर्गत शीर नदीवर बंधारा-कम-पूल मंजूर केला होता. तब्बल १ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर होऊन कामालाही सुरुवात झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ठेकेदाराने काम अर्धवट टाकून पलायन केले. याविरोधात ग्रामपंचायतने ठराव घेत ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे यांनी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले. तरीसुद्धा बंधाऱ्याचे बांधकाम आजतागायत थंडावस्थेतच आहे.
आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचे बिल उचलले गेले असून, बंधारा पूर्ण करण्यासाठी आणखी ६० ते ७० लाखांचा निधी आवश्यक आहे. पण “चांदा ते बांदा” योजना बंद झाल्याने आणि साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे कुठलाही नवीन कंत्राटदार पुढे येत नाही. ग्रामस्थांनी लघुपाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र “निधीअभावी काम रखडले” असेच उत्तर मिळाले आहे.
या अपूर्ण बंधाऱ्यामुळे २०२३ मध्ये दुर्दैवी घटना घडली होती. इंदिरानगरमध्ये राहणारे कवडू येटे हे आपल्या जनावरांना चारून संध्याकाळी परत घरी जात असताना नदीतील खडकावरून त्यांचा पाय घसरल्याने वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतरही शासन प्रशासनाला जाग आली नाही, ही ग्रामस्थांच्या रोषाची ठिणगी ठरली.
अखेर शिवसेनेचे सुरज शहा यांच्या नेतृत्वाखाली नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालय यांच्या पदयात्रा आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलना नंतर घेतलेल्या आमसभेत ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव करून आगामी निवडणुकांमध्ये गावातील कोणताही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही, तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला. जोपर्यंत बंधाऱ्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार कायम राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.
नंदोरी गावात तब्बल ४ हजारांहून अधिक मतदार आहेत. राजकीयदृष्ट्या महत्वाचे ठिकाण असलेल्या या गावाने मतदानावर बहिष्कार टाकल्याने संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्हा पातळीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
