
पोंभुर्णा, ता. प्रतिनीधी:- आशिष नैताम
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे ई-केवायसी, आधार सीडिंग, बँक खाते डिबिटी इनेबल, फिजिकल व्हेरिफिकेशन आदी तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान थांबले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून गावागावात कॅम्प घेऊन अडचणी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी पं.स. पोंभुर्णा येथील माजी सभापती कु. अल्काताई आत्राम व माजी उपसभापती श्री. विनोदभाऊ देशमुख यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केंद्र शासनामार्फत वार्षिक ₹६,००० व राज्य शासनामार्फत वार्षिक ₹६,००० अशा मिळून एकूण ₹१२,००० ची मदत शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत.
“तालुक्यातील प्रत्येक गावात कॅम्प आयोजित करून शेतकऱ्यांचे ई-केवायसी, आधार सीडिंग, फिजिकल व्हेरिफिकेशन व जमीनसंबंधी अन्य अडचणी तत्काळ दूर करून थांबलेले अनुदान जारी करण्यात यावे,” अशी मागणी आत्राम व देशमुख यांनी केली. अतिवृष्टीमुळे शेतकरी गंभीर संकटात सापडले असून शासनाची ही मदत त्यांच्यासाठी खूप मोठा दिलासा देणारी आहे.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तालुका कृषी अधिकारी श्री. सचिन पानसरे यांनी प्रत्येक गावात कॅम्पचे आयोजन करण्यासाठी संबंधित कर्मचारी बांधवांना आदेश दिलेले असून त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ सुलभपणे मिळणार आहे.
या प्रसंगी भाजपा पदाधिकारी श्री. मस्के, बुरांडे, रोहनकर, बोलमवार, ठेंगणे, फरकडे आदी उपस्थित होते.
