
सहसंपादक: रामभाऊ भोयर
नापिकी, कर्जबाजारीपणा मुळे शेतकरी आत्महत्याचा आलेख वाढत आहे. तालुक्यातील संगम (में ) येथील संकेत थुटुरकर( 24 ) व अंतरगाव येथील निलेश कुमरे (27) या युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला. तालुक्यात सर्वत्र या मुळे हळहळ व्यक्त होत आहे. रविवार(दि.17) सुट्टी चा दिवस असतांना देखील तहसीलदार अमित भोईटे यांनी या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रशासन नियमानुसार निश्चित मदत करेन मात्र आत्महत्या हा उपाय नव्हे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
संगम (में ) येथील संकेत ज्ञानेश्वर थुटुरकार या युवा शेतकऱ्याने शेतशिवारातील जिवतोडे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. खाजगी कर्ज, नापिकी या मुळे तॊ विवंचनेत होता. विशेष म्हणजे तॊ निर्व्यसनी होता. घरचा कर्ता मुलगा तोच होता.त्याचे वडिलाचे नावे तीन एकर शेती आहे.साधे सरळमार्गी आई,वडील व लहानभाऊ असा परिवार मागे ठेऊन तॊ या जगातून निघून गेला. अंतरगाव येथील निलेश उर्फ धीरज कालिदास कुमरे या युवा शेतकऱ्याचा विष प्राषन केल्याने मृत्यू झाला. त्याच्या वडिलांच्या नावे 1हेक्टर 62 आर शेती आहे. आई, वडील,पत्नी व एक वर्षाची निष्पाप चिमुकली यांच्यावर दुःखाचा जणू डोंगर कोसळला आहे. कपाशी व तुरीच्या उत्पादनात यंदा घट येण्याची चिन्ह दिसून येत असल्याने हे दोन्ही युवा शेतकरी चिंतेत होते अशी माहिती आहे.
तहसीलदार अमित भोईटे यांनी संगम व अंतरगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले. परिस्थिती समजून घेतली. राळेगाव तालुक्यात मागील वर्षी अतिवृष्टी मुळे तब्बल 11 गावे पाण्याखाली गेली होती. नदी, नाल्याच्या पुराने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले, यंदा देखील पावसाच्या लहरीपणाचा फटका कपाशी व तूर पिकाला बसला आहे. अवकाळी पावसाने देखील मोठे नुकसान झाले. नापिकी, कर्जबाजारीपणा मुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे. शासनाने याची दखल घेउन ठोस आर्थिक मदत करण्याची मागणी होतांना दिसते.
शासकीय नियमानुसार आत्महत्याग्रस्त कुटुंबाला निश्चितच मदत करण्यात येईल. मात्र आत्महत्या ह्या व्हायलाच नको. शेती, शेतकरी संकटात आहे यात दुमत नाही. पावसाची अनियमितता, गेल्या काही वर्षातील पीकस्थिती, अशी अनेक कारणे असतील . मात्र यावर आत्महत्या हा उपाय होऊ शकत नाही. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नसतात उलट ते अधिक बिकट होत असतात. शासनाच्या विविध शेतकरीहितकेंद्रित योजना आहेत त्यांचा लाभ घ्या. काही अडचण असतील तर थेट महसूल प्रशासनाशी संपर्क करा. विविध विभागासोबत समन्वय स्थापन करून आपण मार्ग काढू पण आत्मघाताचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता केवळ शेतकऱ्याच्या मनगटाट आहे. आपल्याला हरून चालणार नाही. चांगले -वाईट दिवस येतात -जातात. मात्र आपल्या पाठीमागे कुटुंबाची होरपळ होईल असा निर्णय कुणी घेऊ नये.
अमित भोईटे
तहसीलदार राळेगाव
