
सहसंपादक: रामभाऊ भोयर
आर्णी तालुक्यातील डेहणी शिवारात तुरीच्या पिकात लपवून गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर एलसीबी पथकाने मंगळवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी धाड टाकून ११३ गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी प्रदीप पांडू आडे (२५, रा. धानोरा तांडा) या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे. या महिन्यातील जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे.
शेतातील तुरीच्या उंच पिकामध्ये गांजा लावून सुरुवातीला ही बाब लपविण्यात आली. परंतु गांजाची झाडे वाढून तुरीपेक्षा उंच झाल्याने परिसरातील लोकांच्या नजरेत ही बाब आली व चर्चा सुरु झाली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने शेताची रेकी करुन खात्री करून पंचांसमक्ष ११३ गांजाची झाडे जप्त केली. अंदाजे ५९ किलो ओला गांजा जप्त झाला असून त्याची बाजारमूल्ये सुमारे २.२४ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात व एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक संतोष मनवर, पवन राठोड, अजय डोळे, मिथून जाधव, बबलू चव्हाण, नीलेश राठोड, योगेश गटलेवार, सोहेल मिर्झा, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर यांनी केली.
गांजा उत्पादनावर पोलिसांची करडी नजर
एलसीबीने आठ दिवसांपूर्वी फुलसावंगी शिवारात अशाच प्रकारची गांजाची शेती उघडकीस आणून संबंधित शेतकऱ्याला अटक केली होती. ऑक्टोबर महिन्यात दोन गांजा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गांजा तेलंगणा व ओरिसामधून आणला जातो असा समज असताना, सलग झालेल्या दोन कारवायांतून जिल्ह्यातही गांजाचे उत्पादन होत असल्याचे समोर आले आहे.
