
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव रावेरी वरूड प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला राळेगाव–रावेरी मार्ग सध्या काटेरी झुडपांच्या वाढत्या प्रमाणामुळे धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी झुडपांनी रस्ता व्यापल्यामुळे वाहनधारकांना योग्य दृश्य दिसत नसल्याने अनेक लहानमोठे अपघात घडत आहेत.
गावांमधील संपर्क सुकर व्हावा आणि नागरिकांना चांगला प्रवास अनुभव मिळावा या उद्देशाने या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, नियमित देखभाल न झाल्याने आता रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे व गवत वाढले आहे. त्यामुळे वाहन चालवताना समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि अपघाताचा धोका वाढला आहे.स्थानिक नागरिकांनी वारंवार पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष या समस्येकडे वेधले असले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
रस्त्याची दुरवस्था व झुडपांचा त्रास यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी, रोजंदारी कामगारांपर्यंत सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांची मागणी आहे की संबंधित विभागाने तातडीने झुडपे काढून रस्ता स्वच्छ करावा, तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत म्हणून नियमित स्वच्छतेचा कार्यक्रम राबवावा. अन्यथा नागरिक रस्ता बंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत.
