
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्थानिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हा काँग्रेस भवन येथे नगराध्यक्ष पद तसेच नगरसेवक पदाकरीता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यवतमाळ नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गाकरिता राखीव असल्याने या पदासाठी एकूण ७ महिला इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी, तेजस्विनी चांदेकर, विद्या कोवे, डॉ. चित्रलेखा पंधरे यांच्यासह इतर दोन महिला इच्छुकांचा समावेश आहे.
दरम्यान, नगरपरिषदेच्या ५८ वार्डांसाठी नगरसेवक पदाच्या एकूण २४७ इच्छुकांनी आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुलाखती दिल्या.
ही मुलाखत प्रक्रिया जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, शहराध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली.
स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, योग्य उमेदवारांची निवड लवकरच पक्ष उच्चस्तरीय बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे यवतमाळ शहरात काँग्रेस उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
