
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब : भरधाव चारचाकी वाहनाने बैलबंडीला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत सहा जण जखमी झाले. यातील दोन महिला अत्यवस्थ आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कळंब-नागपूर रोडवरील श्याम केवटे यांच्या शेताजवळ घडली. या घटनेत एक बैल जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर आहे.
जखमींमध्ये रामचंद्र राऊत (६५), शोभा रामचंद्र राऊत (६०), जया मंगेश चेहरे (३०), यश मंगेश नेहारे (६), आयुष मंगेश नेहारे (५) व रोशनी सूर्यभान वाघाडे (११) (रा.मोठा मारोती परिसर कळंब)यांचा समावेश आहे.
रामचंद्र राऊत हे शेतातून भाजीपाला घेऊन बैलगाडीने कळंबकडे येत होते. दरम्यान, मागून भरधाव येणाऱ्या एमएच ०२-डीझेड २६८८ या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. चारचाकीच्या धडकेत बैलबंडी दोनशे फूट दूर फेकली गेली. या घटनेतील जखमी जया नेहारे व रोशनी वाघाडे अत्यवस्थ आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.जखमींना प्रथम कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे सर्वांना यवतमाळ येथे हलविण्यात आले.
