
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात लंपी आजाराने जनावरे त्रस्त झाली असून पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीतही वाढोणा बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी उपचारासाठी योग्यवेळी उपलब्ध नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी नशेच्या अवस्थेत जनावरांवर उपचार करत असल्याचा आरोप स्थानिक पशुपालक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. “नशेत उपचार करताना जनावरांना अपाय झाला तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जनावरांमध्ये लंपीची लक्षणे वाढत असतानाही कॅम्प नाही
रिधोरा, वाढोणा बाजार, देवस्थान परिसरासह अनेक गावांमध्ये जनावरांना लंपीची लागण दिसून येत आहे. अशा वेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात जाऊन तातडीने कॅम्प घेणे आवश्यक असताना येथे मात्र अधिकारी २४ तास नशेतच राहत असल्याची ओरड पशुपालकांकडून होत आहे.
याच अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी महिला बचत गटातील पशु सखींना असभ्य वागणूक दिल्याचा आरोपही समोर आला आहे. याबाबत पशु सखी व पशुपालकांनी लवकरच औपचारिक तक्रार दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.
पशुपालकांचा संताप : “बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होणार की नाही?”
जनावरांचा आजार दिवसेंदिवस वाढत असताना अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
“अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार?” असा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उमेश गौळकार, सरपंच – रिधोरा, म्हणाले:
“परिसरातील जनावरांना लंपीची लागण झाली असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन कॅम्प घेणे आवश्यक आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत कोणताही कॅम्प घेण्यात आला नाही. माझ्या गावातील देवस्थानच्या जनावरांना लंपीची लागण झाली असता मी स्वतः ती जनावरे खाजगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले.
जर अधिकारी नशेत राहून जनावरांवर उपचार करत असतील तर निश्चितच संबंधितांनी त्यांच्यावर कारवाई करावी.
