हिंगणघाट नगरपरिषदे द्वारे मान्सून पूर्व नाले सफाईच्या कामाला वेग

प्रमोद जुमडे/हिंगणघाट

हिंगणघाट नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून गाळ किंवा कचऱ्यामुळे मोठ्या नाल्यातील पाणी अडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच हवामान बदलामुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्वीची नाले सफाईचे कामे मागील 01 महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहे.l स्वच्छता विभागातील कर्मचारी, जेसीबी व ट्रॅक्टर द्वारे मान्सूनपूर्व नाले सफाईची मोहीम राबविली जात आहे. नालेसफाई अभियाना अंतर्गत मोठ्या व लहान नाल्यांची संपूर्ण स्वच्छता केली जात असून पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्याकरिता याची मदत होणार आहे. सदर नाले सफाई अभियानामुळे नाल्यांमधील वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्तीमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून सुरक्षा प्रदान होईल.
शहरातील मोठ्या व लहान नाल्यांची साफसफाई कामाला वेग आला असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने नाल्यांमधील गाळ व कचरा बाहेर काढण्यात येत आहे तसेच नाल्या भोवती वाढलेली झाडे झुडपी व नाल्यातील साचलेला कचरा बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे. नगरपरिषदेद्वारे आतापर्यंत एकूण 17 मोठे नाले व 28 लहान नाल्यांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री हर्षल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग प्रमुख श्री विशाल ब्राह्मणकर, स्वास्थ निरीक्षक श्री विजय खोब्रागडे, अविनाश चव्हाण तसेच सर्व मुकादम व सर्व स्वच्छता कर्मचारी नालेसफाईच्या कामाला लागले असून सदर नालेसफाई चे काम येत्या 10 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना त्यांच्या प्रभागातील नालेसफाई झाली नसल्यास नगर परिषदेच्या आरोग्य विभाग येथे संपर्क करण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.