
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मारेगाव तालुक्यातील जळका फाट्या जवळ गुरुवारी (दि. ४ डिसेंबर २०२५) रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. वणी–करंजी मार्गावर वणीहून करंजीकडे जात असलेल्या एस.टी. बसला करंजीकडून वणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले असून समोरचा भाग पूर्णपणे चिरडला गेला.या अपघातात बसचालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक व रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. सर्व जखमी प्रवाशांना मारेगाव व करंजी येथील ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी हलविण्यात आले.अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ट्रक चालकाचा ताबा घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांची दखल घेऊन वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
