
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अतिवृष्टी, महापुरामुळे
होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासन-प्रशासन झुलवत असल्याची भावनाच तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांत उमटलेली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या यातनेला निसर्गाएवढेच शासन-प्रशासन जबाबदार असल्याचे वास्तव आता लपून राहिलेले नाही.
महापुरामुळे व अतिवृष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतजमीन खरडून निघाल्याने सोयाबीन कापसासारखी उभी पिके वाहून गेली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. आता शासन-प्रशासनाच्या वरकरणी भूमिका अन् निर्णयामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक व सुलतानी संकटाच्या दुहेरी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशातच सरकारकडून कोट्यवधी रुपयांची अतिवृष्टी मदत व पीक विम्याची घोषणा झाली. शेतकऱ्यांची आम्हास खूप काळजी आहे, असे सांगणाऱ्या शासन-प्रशासनाने शेतकऱ्यांची केवायसीसारख्या तांत्रिक मुद्यावर, तसेच टप्प्याटप्प्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान टाकून पद्धतशीरपणे कोंडी केल्याचे आता लपून राहिलेले नाही.
आजघडीला सरकारने जाहीर केलेली मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. टप्प्यानुसार आर्थिक मदत खात्यावर जमा होईल असे प्रशासनाकडून उत्तर देण्यात येत आहे. आपल्या मोबाइलवर अतिवृष्टी अनुदान जमा झाल्याचा संदेश कधी येतो हे पाहण्यासाठी बळीराजा आतुर आहे. मात्र, तुम्हाला पुढच्या टप्प्यात मदत मिळेल असे प्रशासनातील कर्मचारी बळीराजाला सांगून सरकारी मलमपट्टी करीत आहेत.
महायुती सरकारने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत व पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून मोठा दिलासा दिला आहे. संकटसमयी सरकारने दाखवलेल्या भूमिकेबद्दल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनच आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार म्हणून महायुतीने कर्तव्य पार पाडले आहे.
जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा निलय घिनमिने
तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व महापुराने संकटात असताना प्रशासनाने डोळ्यात तेल घालून शेतकऱ्यांसाठी धाव घेतली. त्यापुढे जाऊन सरकारी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग होण्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखविलेली आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व हितासाठी सदैव कटिबद्ध आहे.
निवासी नायब तहसीलदार नरेंद्र हलामी
शेतकऱ्यांच्या हिताचे जपणूक करणारे सरकार नसल्याने निसर्गानंतर आता सरकारकडून शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा पाहणे सुरू आहे. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना सरकारकडून आपुलकीची भावना मिळालेली नाही.
शेतकरी खुशाल आंबटकर
निसर्गाने कहर माजविल्यानंतर सरकार शेतकऱ्यांचा वाली होईल अशी अपेक्षा होती. मात्र, केवायसीच्या नावाखाली तांत्रिक मुद्दे तयार करून व मदतीचा विलंब करून शेतकऱ्यांची अक्षरशः चेष्टा सुरू केली आहे. ही गंभीर बाब असून
अतिवृष्टी, महापुराने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत होण्याऐवजी मदतीचा देखावा निर्माण केला जात आहे.
गोवर्धन वाघमारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव
