विधानसभा निवडणुकी युती-आघाडीत उमेदवार वाढले
राजकीय पक्षासाठी ठरतेय डोकेदुकी
इच्छुक वाढल्याने बंडखोरीची भीती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यावेळच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी स्पर्धा वाढली आहे, प्रत्येक पक्षात एकापेक्षा अधिक इच्छुक तयारी करीत आहेत. त्यामुळे इच्छुकांना उमेदवारीसाठी आधी घरातच संघर्ष करावा लागणार आहे, तेथे टिकाव लागल्यानंतर आपल्याच पक्षाला जागा सोडवून घेण्यासाठी मित्रपक्षांशी संघर्ष करावा लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात विरोधकांशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे यावेळची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही, असे चित्र आहे.
विधानसभा निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांची उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यातील २०२९ च्या निवडणुकीत सात विधानसभा मतदारसंघात सात पैकी पाच विधानसभा मतदार संघात महायुतीतील घटक पक्षाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष राहणार आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये तीन-तीन घटक पक्ष आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाला मतदारसंघ सुटावा, यासाठी सगळेच प्रयत्न करीत आहेत. शिवाय प्रत्येकघटक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी सुरुवातीला आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांशी संघर्ष होताना जिल्ह्यात दिसत आहे. त्यानंतर मतदारसंघ आपल्या पक्षाला सोडवून घेण्यासाठी युती- आघाडीतील मित्रपक्षांशी संघर्ष करून जागा आपल्या पक्षासाठी सोडवून घ्यावी लागेल. त्यानंतर कुठे विरोधकांशी निवडणुकीत दोन हात करावे लागणार आहेत.
जिल्ह्यात सध्या इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. वरिष्ठ पातळीवरुन अद्याप अधिकृत उमेदवारी घोषित झालेली नाही. असे असले तरी इच्छुकांनी तयारी सुरू केली असून मतदारसंघात आपापल्या परीने संपर्क वाढविला आहे.

यंदा उमेदवारी मिळविण्यासाठीच इच्छुकांना झगडावे लागणार आहे
आपल्याच पक्षाला जागा सोडवून उमेदवारी मिळविणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही, असेच दिसते.

मतदारसंघातील सध्याचे चित्र

राळेगांव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. आमदार अशोक उईके यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत यापूर्वी येथे झाली आहे. यावेळीही काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. मतदारसंघावर दावा सांगितला आहे. संभाजी ब्रिगेडने देखील या मतदार संघावर दावा सांगितला आहे. तर मनसेने कडूनही यावेळी राळेगांव विधानसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर करणार असल्याचे दिसून येत आहे.

वरिष्ठांसमोर आव्हान

प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाकडे इच्छुकही एकापेक्षा अधिक आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडे प्रत्येकी ३ घटक पक्ष आहेत. तीनपैकी एकाच पक्षाला जागा सुटेल. त्यामुळे उरलेल्या दोन पक्षांतील इच्छुक मंडळी बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, युती- आघाडीतील मित्रपक्षही मतदारसंघावर दावा सांगत आहेत. त्यामुळे त्यांनाही शांत करण्याचे आव्हान वरिष्ठांसमोर राहणार आहे.