प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. शैलेष निसळ यांच्याकडून जि. प.उ.प्रा.शाळा, खुर्सापार शाळेला संगणक संच भेट

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ


तालुका प्रतिनिधी/१०जानेवारी
काटोल – नागपूर येथील प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. शैलेष निसळ यांनी जि. प.उ.प्रा.शाळा, खुर्सापार येथे लोकसहभाग दर्शवून संगणक संच भेट दिला.
डॉ.निसळ, त्यांच्या पत्नी रम्या व मुलगी नमिता यांनी शाळेला नुकतीच भेट दिली. डॉ. शैलेष निसळ यांचे वडील डॉ. मधुकर निसळ यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपल्या वडिलांची विद्यार्थ्यांसाठी काही करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण ही भेट देत असल्याचे, डॉ.शैलेष निसळ यांनी सांगितले. या संगणकाचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या संगणकाच्या देखभाल व दुरुस्तीची कायमची जबाबदारी स्वतःकडे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. संगणक, स्पीकर्स, वेब कॅम, वायफाय मॉडेम असा सुसज्ज संच त्यांनी भेट दिला.
याप्रसंगी, निसळ कुटुंबियांसह भूमीहीन शेतमजूर संस्था गाझियाबादचे सचिव कवडुजी मने, ग्रामपंचायत खुर्सापारचे सरपंच सुधीर गोतमारे, उपसरपंच प्रदीप सलाम, ग्रामसेवक भादे हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक निलेश पोपटकर यांनी तर आभारप्रदर्शन महेंद्र निमजे यांनी केले.