स्पर्धा परीक्षेची तयारी दहावी पासून करावी – प्रा.रविंद्र सरकार,जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा उपक्रम

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


काटोल – पहिल्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे.मूळ संकल्पना व संबोध दहावी-बारावीत स्पष्ट झाले तर स्पर्धा परीक्षेत यश हमखास मिळते.म्हणून दहावीत असतांनाच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करावी, असे प्रतिपादन प्रा.रविंद्र सरकार यांनी ग्रेट भेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, आगार व्यवस्थापक रतन रामटेके, प्रा.पल्लवी सरकार, केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे, शिक्षक कपिल आंबुडारे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे प्रा.रविंद्र सरकार म्हणाले, स्पर्धा परीक्षेमधील महत्त्वाचा घटक चालू घडामोडीचा अभ्यास वर्तमानपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे.भारतीय संविधानाचा जास्तीत जास्त अभ्यास करावा कारण जीवनाला आकार देण्याचे काम संविधान करते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश भोयर, संचालन गुंजन रिठे तर आभार प्रदर्शन अजित निंबुळकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगणक ऑपरेटर सतिश बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर, सुरक्षा रक्षक प्रल्हाद पडोळे, रॉबिन खुरपडे, अक्षय कावटे, राधिका लाखे, जास्मिन अंसारी, शुभम शिरपूरकर, अश्विनी गाढवे, मयुरी डाखोळे, अभिषेक भलावी आदींनी सहकार्य केले.