
प्रतिनिधी//शेख रमजान
वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारून शाळेचा कारभार सांभाळला.
विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षण, उपस्थिती, शिस्तपालन, सूचना फलक व दैनंदिन नियोजन यासह सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव व प्रशासनाची समज विकसित झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी मार्गदर्शन करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावताना आलेला अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केला. अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी, शिस्त राखण्याची जबाबदारी तसेच वेळेचे नियोजन याची जाणीव झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पर्यवेक्षिका कुमारी मंगला गावंडे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत शेंडे, राजू वैद्य, कुमारी मनीषा कदम, कुमारी सीमा रावते, कुमारी शुभदा बिडवई व ज्ञानेश्वर चिखलपल्ले उपस्थित होते.
वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे पार पडलेल्या या स्वयंशासन दिन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व, जबाबदारी व शिस्त यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले
वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित या स्वयंशासन दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सुबलकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन कमलाकर दुलेवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
