लेख:योगाभ्यास काळाची गरज ✍🏻राजेंद्र टेकाडे, काटोल

आधुनिक जीवन शैलीमुळे मानव विविध आजाराने त्रस्त आहे.शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगभ्यास काळाची गरज बनली आहे.वाढत्या शहरीकरण व औद्योगिकरणामुळे निर्माण झालेले मानसिक ताण तणाव,जल-वायू व ध्वनी प्रदूषणामुळे निर्माण झालेले श्वसनाचे अनेक विकार, जवळजवळ ९०% लोकांना त्रस्त करून सोडणारे अँसिडीटी, बद्धकोष्ठता इ. व्याधी यामुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललेले दिसते. अनेक विकारांमुळे त्रस्त झालेले बहुतेकजण तात्काळ आराम मिळावा म्हणून भरमसाठ औषधे घेण्याच्या मागे लागलेले दिसतात. परंतु या विकारांपासून कायम मुक्त होण्याचा मार्ग त्यांना सहसा माहीत नसतो. औषधांचा वापर न करता, अनेक प्रकारच्या विकारांवर कायम स्वरूपाचा इलाज म्हणजे ‘योगाभ्यास’ आहे.
मानव निसर्गापासून जितका दूर जाईल तितका आजाराच्या विळख्यात गुरफटला जाईल.अलीकडे विविध कारणांमुळे लोक योगाकडे आकर्षित होताना दिसतात.शारीरिक व्यायाम, मनशांती, व्याधी उपचार किंवा फिटनेस या दृष्टीने योगाकडे पाहण्याची वृत्तीत वाढ होत आहे.वास्तविक योगाची उच्चतम तत्वे आणि धेय ध्यानात घेतले तर केवळ व्याधी निवारण हा योगाचा उद्देश नाही. योग म्हणजे योगासने हा सार्वत्रिक गैरसमज देखील किती चुकीच्या धारणावर आधारित आहे हे देखील स्पष्ट होते. योग परंपरा जितकी जुनी आहे तितकाच त्याच्या अभ्यासाची खोली मोठी आहे.
मुळात योग हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे.एकंदरीतच शरीर व मनाला एकत्रित जोडणे म्हणजेच योग. यात व्यक्तिगत साधनेला खूप महत्त्व आहे. योगाचे विविध प्रकार फार पूर्वी पासून प्रचलीत आहेत. त्यामध्ये मंत्र योग, ध्यान योग, भक्ती योग, कर्म योग त्याच प्रमाणे जास्तीत जास्त हठयोगाचे प्रसारण झालेले दिसते. हठयोग म्हणजे संपूर्ण शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरण करणे होय. हठयोगाचा एक वेगळा शारीरिक अर्थ असा सांगितला जातो की ‘ह’ म्हणजे उजव्या नासिकेतून होणारा आणि ‘ठ’ म्हणजे डाव्या नासिकेतून होणारा श्वासोच्छवास होय. यांना अनुक्रमे सूर्य नाडी आणि चंद्र नाडी असे म्हणतात. या दोन्ही नासिकांचे ऐक्य साधून आणण्याच्या प्रयत्नाला हठयोग असे म्हणतात.
यामध्ये मंत्र योगा ला देखील खूप महत्व आहे. मंत्रातून होणाऱ्या ध्वनीतुन निर्माण झालेले स्पंदन याचे आप-आपले वेगळे असे महत्व आहे. मंत्राच्या उच्चारणाने ध्वनी निर्माण होऊन शरीरात कंपन तयार होतात. याचे अध्यात्मिक महत्व देखील बरेच सांगितले जाते. पण त्या पलीकडे जाऊन मंत्राने आपल्याला मन स्थिर होण्यास मदत होते. त्याचबरोबर वाणी शुद्ध होऊन शब्दउच्चार स्पष्ट होतात.
आजच्या धकाधकीच्या जीवन शैलीवर ताबा मिळवायचा असेल तर योग साठी वेळ देणे आवश्यकच आहे. योग आपल्या जीवनातील सर्व नस-नाड्याचे शुद्धीकरण करतो. शरीर स्वस्थ ठेवण्यास मदत तसेच ताण तणावासंबंधी हार्मोन्सला नियंत्रित करण्यात देखील मदत करतो. तणाव आणि मानसिक रोग या सारखे आजार दूर करण्यासाठी योग हा उत्तम उपाय म्हणता येईल.
सन २०१५ पासून २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून घोषित केल्यापासून बऱ्याच शाळांमध्ये, कॉलोनीमध्ये देखील योग शिकण्यास सुरुवात झालेली दिसते. तसेच समाजातील काही संस्था देखील योगासन स्पर्धेचं आयोजन करताना दिसतात.शालेय स्पर्धेत योग खेळाचा समावेश केल्यामुळे व माध्यमिक – उच्च माध्यमिक परीक्षेत गुण वाढीत असल्यामुळे विद्यार्थी योग कडे खेळ म्हणून आकर्षित झाले आहे.
योगाभ्यास म्हटलं की सर्वसामान्य माणसाला अस वाटत की हे प्राचीन शास्त्र सन्याशांसाठी आहे व आपल्याला त्याचा काही विशेष उपयोग नाही. हा योगविषयीचा सर्वात मोठा गैरसमज आहे. वास्तविक योगातील क्रिया व आसने ही गृहस्थाश्रमियांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. आणखी एक गैरसमज असा की योग म्हणजे ‘योगासने’ आहेत. वास्तविक योगासने हा योगाचा एक विभाग , अष्टांग योगाचे एक अंग आहे. तो महत्वाचा आहे. पण तो म्हणजे पूर्णपणे योग नव्हे.
योग हे अष्टांगयोग वर आधारलेले आहे. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायम,प्रत्याहार, धारणा, ध्यान,समाधी यांचा अभ्यास केला जातो. यामधील प्रत्येक अंगाला हे अनन्य साधारण असे महत्व जरी सले, तरी मानवाला सामान्य जीवन जगताना अतिशय उपयोगी असणारे अंग म्हणजे १) यम व नियम होय.यम म्हणजे सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण केलेली अशी तत्वे की, ज्यामुळे समाजाचे स्वास्थ्य नीट राहू शकते. तर नियम म्हणजे स्वतःच्या स्वास्थ्यासाठी असलेले काही नियम व यामधील पुढील पायरी म्हणजे आसन.
ताण-तणावामुळे मनावर परिणाम होतो. आणि यामुळे शरीरावर परिणाम होऊन मांस पेशी कडक होतात. स्नायू व्यवस्थित कार्य करत नाहीत. यामुळे शरीराची लवचिकता देखील नाहीशी होते. ही लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आसन करणे गरजेचे आहे. योगभ्यासचा प्रारंभ करतांना मार्गदर्शक आवश्यक आहे.शास्त्रीय पद्धतीने योगाभ्यास करावा अन्यथा फायद्या ऐवजी नुकसान होईल.
मानवी मनाचा व शरीराच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच आरोग्य संपन्नतेकरिता काळाजी निकड लक्षात घेऊन योगाभ्यास प्रारंभ करावा.

✍🏻 राजेंद्र विमल रामहरी टेकाडे
काटोल जि. नागपूर
संपर्क : 9145779050