
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर
चंद्रपुर : महामारी कोरोना परिस्थितीत घुग्घुस शहरासाठी वरदान ठरलेल्या वेकोली चे राजीव रतन रुग्णालयाची सध्या ओळख झालेली आहे. येथील आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व इतर सेवक दिवसरात्र रुग्णाच्या सेवेत कर्तव्य बजावीत आहे. घुग्घुस येथे मोठ्या प्रमाणात वेकोलि परिसर आहे. वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात घुग्घुस व वेकोलिच्या लोकवस्तीत दिसून येत आहे. सध्या राजीव रतन रुग्णालयात येथे २८ ऑक्सिजन बेड तर व २८ असे सर्वसाधारण बेड्स उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेत येत्या काही दिवसात १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १५ पूर्ण क्षमतेचे व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन प्लॉट लवकरात लवकर उपलब्ध करण्याची गरज आहे. कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत WHO ने निर्देश दिले आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता वेकोली मार्फत नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
आज माजी समाजकल्याण सभापती तथा जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी राजीव रतन वैदकीय अधीक्षक डॉ.आनंदे यांची भेट घेऊन रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या असता याठिकाणी ऑक्सिजन कमी पडत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित वेकोली महाप्रबंधक व जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली आहे.
राजीव रतन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आनंदे वैद्यकीय पदाचे कर्तव्य बजावीत कोरोना रुग्णांच्या सेवेत रात्रंदिवस कार्यरीत आहे. राजीव रतन रुग्णालयातील डॉ. चौधरी व वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असणारे 100 आरोग्य सेवक व सहाय्यक कर्तव्य बजावीत आहे. तसेच कोवीड उपचार केंद्र उभारण्यास नेहमी अग्रस्थानी असणारे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर वेकोली वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे यांचे ब्रिजभूषण पाझारे यांनी आभार मानले आहे.
