
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)
…दुसऱ्या लाॅकडाऊन मुळे सर्वसामान्यां सह “हातावर आणून पानावर खाणारे पार लंबेलाट झाले असून,प्रशासनाने रोजंदारी कामगारांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
;-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लावण्यात आली असून लोकांनी कामावर न जाता घरी बसणे हेच मोठे योगदान आज ठरत आहे. कंपन्या, कारखाने, ऑफीस, सर्वच बंद, रोजची कामेही बंद झाली आहेत. ही परिस्थितीची गरजेही आहे. मात्र हातावर पोट असलेल्या रोज कमावून खाणाऱ्यांचे काय, हा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका कामगारांनाच बसत आहे. काम बंद झाल्याने घरी बसून आहेत. तेव्हा जगणार कसे? खाणार काय? कुटुंबाचे काय? असे अनेक प्रश्न यांच्यापुढे आवासून उभे आहेत.
सध्या घरकाम करणाऱ्या मोलकरणी, बांधकाम मजूर, कारखान्यात काम करणारे कामगार, वीटभट्टीवर काम करणारे मजूर, लहान दुकानात काम करणारे, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणारे, बिल्डरकडे काम करणारे, छोट्या ऑफीसमध्ये काम करणारे आदींचा यात समावेश होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांचेच काम एका झटक्यात सुटले. शासनाने कितीही सांगितले की अशा लोकांचे वेतन कापू नये, कामगार विभागाने जी.आर. सुद्धा जारी केला की कोणत्याही मजुराचे किंवा कामगारांचे वेतन कापल्या जाणार नाही. परंतु याचे पालन किती होणार? हा मुख्य मुद्दा आहे. घरच्या मोलकरणीला पगारी सुटी देणारे कितीजण असतील, हाही मुख्य प्रश्न आहे. सध्याची परिस्थिती आटोक्यात आली तर ठीक अन्यथा समोरची स्थिती यापेक्षा भीषण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यादरम्यान त्यांच्याकडे पैसे असण्याचा प्रश्नच येत नाही. काही सामाजिक संघटना पुढाकार घेऊन रस्त्यावरीच गरीब, निराधारांची मदत करीत आहेत. परंतु या असंघटित कामगारांकडे सध्या तरी दुर्लक्ष आहे. तेव्हा अशांसाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे.
