आंतरराष्ट्रीय मॅथ ऑलिम्पियाड स्पर्धेत नाशिकच्या विद्यार्थांनी केली पदकांची कमाई

प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक

अतिशय प्रतिष्ठेच्या सिंगापूर अँड एशियन स्कुल्स म्याथ ऑलिम्पियाड (SASMO) या स्पर्धेत नाशिक च्या विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि ४ कांस्य पदकाची कमाई करत नाशिक चे नाव जागतिक पातळीवर चमकविले आहे.SASMO हि स्पर्धा १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर खुली आहे.यावर्षी कोरोनाचे सावट असून सुद्धा जगातील २६ देशातील जवळपास ३०,००० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.नाशिक मधून जिनिअस किड या नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.SASMO यावर्षी ऑनलाईन स्वरूपात आयोजित केली गेली होती. जवळपास ९० मिनिटे असलेली हि स्पर्धा अतिशय कठीण प्रशांद्वारे मुलांचे गणिताच्या ज्ञानाची परीक्षा घेत असते.

नाशिकच्या आर्यन शुक्ल (इयत्ता ५ वी) याने “सुवर्ण पदक” मिळवत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गणिताच्या बुद्धिमत्तेला सिद्ध केले आहे. यापूर्वी सुद्धा आर्यन ने अनेक जागतिक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.सुवर्ण पदक मिळविल्यामुळे आर्यन जुलै मध्ये आयोजित जागतिक अंतिम फेरी साठी पात्र ठरला आहे तसेच डिसेंबर मध्ये होणाऱ्या अतिशय प्रतिष्ठेच्या “आंतरराष्ट्रीय ज्युनिअर मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड – २०२१” साठी सुद्धा पात्र ठरला आहे.

मिधांश साखला (३ री), अवनीश निकम (४ थी), मनस्वी रचलवार (५ वी) आणि गार्गी जोशी (७ वी) यांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करत “कांस्य पदक” मिळविले आहे. आर्यन शुक्ल बरोबर हे चारही विद्यार्थी जुलै २०२१ मधील “सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड चॅलेंज – २०२१” साठी पात्र ठरले असून भारताचे प्रतिनिधीत्व ते करणार आहेत. याच बरोबर कलश शिंदे (४ थी), स्वानंद पाठक (५ वी) आणि आर्यन दळवी (७ वी) यांनी “उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रक” मिळवत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली आहे.

सर्व विद्यार्थ्यांना जिनिअस किड नाशिकचे संचालक नितीन जगताप तसेच नितीन शुक्ल आणि सुनीता पारख यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेत नाशिकमधील गुणवान विद्यार्थी सहभाग घेऊ शकतील यासाठी “सिंगापूर इंटरनॅशनल मास्टरी कॉन्टेस्ट सेन्टर” चे भारतातील प्रमुख रुपेंद्र दुबे यांनी मोलाची साथ दिली. आगामी काळात नाशिक मधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असून जागतिक स्तरावर यामुळे शहराचे आणि देशाचे नाव उंचावणार आहे.