
सहसंपादक:प्रशांत बदकी
वाशिम – टाळेबंदी कालावधीमध्ये सर्व व्यवहार बंद असल्यामुळे विद्युत वापर देयके व नगर परिषद करामधील घरपट्टी, नळपट्टी इत्यादी विलंब आकार वसुलीस स्थगिती देवून विलंब आकार रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ९ जून रोजी प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, राज्यातील टाळेबंदीमुळे निर्माण झालेली स्थिती, आलेले चांगले वाईट परिणाम, थांबलेले अर्थचक्र, बंद झालेले रोजंदारी उत्पन्न, अल्प व अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटाची व ज्याला कुणाला शासकीय योजनांचा लाभ मिळू शकत नाही, कोठूनच दिलासा मिळाला नाही. अशा समाजघटकांना त्यांचे विद्युत वापर आकार, त्यावरील विलंब आकार तसेच न.प. ने लावलेल्या विविध करावरील विलंब आकार म्हणजेच व्याज आकारणी स्थगीत करुन रद्द करण्यात यावी व भविष्यात टाळेबंद संपल्यानंतर राज्याची आर्थिक घडी व्यवस्थीत होईपर्यत सर्वच हातांना काम मिळेपर्यत सदर विलंब आकार रद्द ठेवण्यात यावा. याबाबत संबंधीत विभागाच्या प्रशासकीय प्रमुखांना सुचित करण्यात येवून जनहिताचा निर्णय विनाविलंब घेण्याची तत्परता प्रशासनाने दाखवावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
