
वाशिम – कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये जिल्हयात सर्वत्र टाळेबंदी सुरु असतांना सर्व रोजगार ठप्प पडल्यामुळे विविध बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि वित्तीय संस्थांकडून उचलेल्या कर्जाचे हप्ते भरणे जनतेला शक्य नाही. अशा परिस्थितीत विविध बँका, वित्त पुरवठा संस्था आदीमधून कष्टकरी नागरीकांनी उचललेल्या कर्जाच्या परतफेडीचे हप्ते माहे मार्च ते जुन पर्यत स्थगित करण्याचे आदेश देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या अल्प उत्पन्न असलेल्या गटातील कष्टकरी समाजघटकांनी लहान उद्योगाकरीता खाजगी वित्त पुरवठा करणार्या वित्त संस्था, सहकारी बँका, शासकीय बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. या कर्जाचे परतफेडीकरीता संबंधीत संस्था तगादा लावत आहेत. ज्यांनी कर्ज घेतले त्यांचे उद्योगधंदे बंद आहेत. कोरोना महामारीमुळे उदरनिर्वाहाची सोय अशक्यप्राय दिसत आहे. मदतीची प्रतिक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीमध्ये कर्जाची परतफेड शक्य होत नाही. याकरीता माहे मार्च ते ३० जुन २०२१ पर्यतचे कर्जाचे हप्त्याच्या वसुलीस स्थगीती देण्यात यावी. तसेच या स्थगीत हप्त्यावर व्याज आकारण्यात येवू नये. अशा आशयाचे निर्देश संबंधीत शासकीय, सहकारी, खाजगी वित्त संस्था यांना देण्यात यावेत. जेणेकरुन संकटात असलेल्या व आपत्तीग्रस्त असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळेल. या बाबीवर मानवतावादी दृष्टीकोनातून सकारात्मक विचार करुन आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना करण्यात आली आहे.
🛑 #MNS9SMS
