
चंद्रपूर:शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील सुमारे २०० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तेलुगू समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर आणि लागून असलेल्या शासकीय जमिनीवर काही इसमांनी अवैध कब्जा करून तिची विक्री सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव श्री. किशोर मडगूलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब तक्रार करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारीनुसार, महाकाली कॉलरी येथील मौजा चांदा (रै.) येथील सर्वे नं. ४१४ ही ०.७६.०० हेक्टर जागा शासकीय ‘झुडपी जंगल’ म्हणून नोंदणीकृत आहे. याच जागेला लागून तेलुगू समाजाची पारंपरिक स्मशानभूमी आहे, जिथे गेल्या दोन शतकांपासून अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, परिसरातील काही खाजगी भूखंडधारक (सर्वे नं. ४१३, ४१५/१, २, ३ आणि ४१६) आपली जागा असल्याचे भासवून सरकारी जमिनीची २०० रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने नोटरी करून अवैध विक्री करत आहेत.
पूर्वजांच्या समाधींची विटंबना:
आरोपांनुसार, संबंधित गैर अर्जदारांनी स्मशानभूमीच्या जागेवर चक्क जेसीपी (JCB) मशीन लावून जुन्या समाधी उखडून फेकल्या आहेत. यामुळे तेलुगू समाजाच्या भावना दुखावल्या असून, आपल्या पूर्वजांच्या अस्थींची विटंबना झाल्याचा संताप समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
कडक कारवाईची मागणी:
मणसेचे जिल्हा सचिव किशोर मडगूलवार यांनी मा.जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब दिलेल्या पत्रात मागणी केली आहे की, भूमिअभिलेख कार्यालयामार्फत या जागेची तात्काळ ‘मौका चौकशी’ करण्यात यावी. तसेच, सरकारी जमिनीची अवैध विक्री करणाऱ्या रामटेके यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी.
या तक्रारीमुळे आता जिल्हा प्रशासन आणि भूमी अभिलेख विभाग यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या वेळी जिल्हाउपाध्यक्ष मनविसे कुलदीप चंदनखेडे योगेश सदालावार प्रविन शेवते क्रिष्णा गुप्ता फिरोज शेख राजु देवागंन शंकर भडके साहील खान पटान व राजु नागपुरे उपस्तित होते
