
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातून वर्धा नदी पात्रातून रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून रेती वाहतूक करणारे ट्रक रात्रीच्या वेळी भरधाव वेगात जात असताना सावंगी आणि राळेगाव दरम्यान असलेल्या महामार्ग ३६१ बी वर गुरुवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या दोन भरधाव ट्रकमध्ये भीषण धडक झाली असून या धडकेत दरम्यान असलेल्या एका स्वीफ्ट डिझायर कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सुदैवाने, या भीषण अपघातात जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 361बी मार्गा वर रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक करणारे ट्रक भरधाव वेगात चालत असून यात चालकांचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बाजूला असलेल्या कारचा पूर्णपणे चकनाचूर झाला आहे. मात्र या झालेल्या अपघाताच्या ठिकाणावरील ट्रक व स्वीप डिझायर गाडी तसेच ट्रक मधील असलेल्या रेतीचा विल्हेवाट करण्यात आला होता
सकाळी सर्व पुरावे लंपास?
आश्चर्याची बाब म्हणजे, रात्री घडलेल्या या एवढ्या मोठ्या अपघातानंतर सकाळी घटनास्थळावरून रेती आणि अपघातग्रस्त गाड्या तातडीने हटवण्यात आल्या. “रात्रीच्या अंधारात तांडव करणारी ही वाहने आणि सकाळी झालेली ही ‘साफसफाई’ प्रशासनाला दिसली नाही का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाने लगाम लावण्याची गरज
या मार्गावरून होणारी अवैध आणि बेदरकार रेती वाहतूक सामान्य प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. आज केवळ नशिबाने जीवितहानी टळली असली, तरी या ‘रेती माफियांना’ वेळीच आवर घातला नाही, तर एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी आणि संबंधित विभागाने या भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
