काय झाडी,काय डोंगर ,काय धरण , काय पाऊस, काय कविता,बोरधरणच्या जंगलात रंगला मृदंगध कविता महोत्सव

..

मृदगंध साहित्य चळवळ नागपूर च्या वतीने बोरधरण येथिल महाराष्ट्र पर्यटन विकास मंहामंडळ सभागृहात निसर्गाच्या कुशीत कविता महोत्सव -२०२२ चे आयोजन सुप्रसिद्ध लेखिका / कवयित्री मा. डाॕ. स्मिता मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कविता महोत्सवाला उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका, कवयित्री तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मा. डाॕ. लीना निकम तथा प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ वतन साप्ताहिकचे मालक संपादक मा. गोपाल कडूकर लाभले होते.
पाऊस तसा सृष्टीला नवचैतन्य देतो तशी कविता आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला फुलवते ,जगवते आणि आनंद देते म्हणून अशा कविता महोत्सवाचे आयोजन व्हायला हवे… नवकवींना सुद्धा यातून ऊर्जा मिळते आणि लिखाणासाठी प्रेरणा मिळते. पुढ्यात येणारे नवनवे विषय कवींनी आपल्या कवितेत आणायला हवे. उद्घाटक म्हणून डॉ. लीना निकम अतिशय ओघवते बोलत होत्या.
बुद्धकालीन थेरी गाथांचा उल्लेख करून डॉ. स्मिता मेहेत्रे म्हणाल्या की कविता हा सर्वात प्राचीन साहित्यप्रकार आहे. आजही तो तितकाच लोकप्रिय. कवींनी बदलत्या परिस्थितीचा वेध आपल्या कवितांमध्ये घेतला पाहिजे.
प्रसंगी सदर कविता महोत्सवात सुप्रसिद्ध लेखक कवी मा. लिलाधर दवंडे ,कामठी यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल तथा त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्कार करण्यात आला. या देखण्या सोहळ्याच्या पहिल्या सत्राचे अतिशय दिमाखदार सुत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री ,गझलकार मा, प्रा. चित्रा कहाते यांनी केले. सदर कविता महोत्सवच्या दोन सत्रात दिड डझन पेक्षा जास्त डाॕ, सह इंजिनियर प्राध्यापक, कामगार,गृहिणी अश्या एकुण पन्नास कवि कवयित्री यांनी सहभाग घेतला असून विविध विषयवरील एकापेक्षा एक सरस मंत्रमुग्ध करणाऱ्या कविता सादर करण्यात आल्या. गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त अस्सल वऱ्हाडी कवी मा. दिवाकर देशमुख यांच्या पिशवीने उपस्थितांना लोटपोट हसविले.
पिशवी – कोण म्हणते लग्नानंतर खूप मजा असते , मला तर नेहमी पिशव्याच समोर दिसते.
लोकशाही – रडत रडत तिरंगा घेऊन मतदाराकडे गेली भाऊ, म्हणलं यायच्या बुडाखाली खुर्चीच नका ठेऊ पहिल्या सत्राचे आभार प्रदर्शन कवयित्री तथा झिरो माईल कलादालन अध्यक्ष मा. धनश्री पाटील यांनी मानले.खास चुलीवरच्या जेवण्याच्या पाहुणचारानंतर दुसऱ्या सत्राचे दिमाखदार सुत्रसंचालन कवयित्री मंजुषा कऊटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कवयित्री तथा कलाप्रेमी शिक्षक मंच च्या नागपूर जिल्हाअध्यक्ष मा. नीशा, खापरे यांनी मानले. कविता महोत्सवात प्रामुख्याने मा. प्रा, मीनल येवले,गझलकार इंजिनियर अझिझखान पठाण , मंदा खंडारे, इंजिनियर गणेश पांडे , इंजिनियर भुपेश नेतानराव , प्रमोद भागडे, प्रकाश हेडाऊ , नीशा खापरे, मंजू हेडाऊ , प्रा. कमलेश सोनकुसळे, डाॕ. अनील गवळी,कामगार कवी लिलाधर दवंडे ,डाॕ.वीणा राऊत , डाॕ. संगीता बानाईत. डाॕ. संगीता उमाळे, तथा रसिक देवदत्त संगेप सह अनेक दिग्गज साहित्यिक यांनी हजेरी लावली होती, निसर्गाच्या सानिध्यात हे अफलातून व कल्पक आयोजन मृदगंध साहित्य चळवळ चे प्रमुख मा. शंकर घोरसे यांनी केले होते. उपस्थितांनी नैसर्गिक पर्यटनासह मनसोक्त साहित्यिक आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पांडेय ट्रॕव्हल्स नागपूर सह मा. किर्ती लंगडे, मंजुषा कऊटकर , राजेश माहुरकर , सुधीर पुंजे, वंदना घोरसे,भूवनेश्वरी घावडे , यांनी अथक परिश्रम घेतले. कविता महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी सुद्धा कार्यक्रमात आपली हजेरी लावली होती. असेच विविध कल्पक आयोजन सदोदित होत राहील तथा साहित्यिकांच्या सकस लेखनीतून नवनव्या विचारांचे दान मिळत राहील असे मत कविता महोत्सव आयोजक शंकर घोरसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले तथा पुढील साहित्यिक प्रवासासाठी सहभागी कवी कवयित्री यांना भरभरून शुभेच्छा दिल्यात.