
चंद्रपूर, 11 सप्टेंबर
निर्माणाधीन घराच्या बांधकामाचे पेंट व ईलेक्ट्रीक साहित्य लंपास करणार्या दोन आरोपींना पोलसांनी अटक केली. आरोपींकडून 3 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शादाब शब्बीर सैफी (29) व सोहेल कादीर सय्यद (28, रा. दोघेही दुर्गापूर, जि. चंद्रपूर) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
देवाडा येथील रामप्रवेश धिरज ठाकुर यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असून, पेंटचे डब्बे व ईलेक्ट्रीक साहित्य कुणीतरी चोरी केले. या बाबतची तक्रार त्यांनी पडोली पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान गुन्हे शाखेचे पथक पडोली परिसरात गस्तीवर असताना दुर्गापूर येथील शादाब शब्बीर सैफी व सोहेल कादीर सय्यद हे रेकॉर्डवरील आरोपी चोरीचा पेंट व ईलेक्ट्रीक साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेवून त्यांच्याकडून घरफोडीसाठी वापरण्यात आलेली ऑटोरीक्षा, दुचाकी, पेंट व ईलेक्ट्रीक साहित्यांसह एकूण 3 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, सहायक पोलिस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सुनिल गौरकार, हवालदार सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे आदींनी केली.