
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर
राज्यातील, परीक्षा ,नियुक्त्या रखडलेल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास 15 लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि त्यातच मागील 2-3 वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडने, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावय आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक,आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. ह्या सर्व बाबी राज्याच्या दृष्टीकोनातून घातक आहेत. युवक,विद्यार्थी असा बेजार होत असेल तर राज्याची प्रगती सुद्धा खुंटेल.
मागील 3 वर्षांपासून जून 2018 ते जून 2021 या कालावधीत राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या 6 ऐवजी 2 अशी आहे.मागील सरकारने आणि या सरकारने सुद्धा याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे निर्णय प्रक्रिया संथ झाली व आयोगाच्या अधिकारांवर गदा आली.MPSC ही संविधानिक संस्था असून सुद्धा सरकार त्याला मन मर्जी नुसार वागवू पाहत आहे हे लोकशाहीच्या स्वास्थासाठी घातक आहे. त्यामुळे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर च्या वतीने आज उपविभागीय अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रशांत करपते, केळापूर तालुकाध्यक्ष सुमित चाटाळे, अंगद गाडगे, अनुप ठाकरे, निखिल लेनगुरे, वैभव सामृतवार, सिद्धार्थ कांबळे,पंकज वहिले, श्रीकांत वातिले, चंदन भिसे, अभय बोरुले, दत्तात्रय मडावी, तेजस चांदुरकर, कमलजितसिंग पत्रे, विपीन भोयर आदी विद्यार्थी उपस्थित होते..
निवेदनातील काही प्रमुख मागण्या
1)MPSC राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या 6 असायला पाहिजे परंतु मागील 3 वर्षांपासून दोनच सदस्य MPSC चा डोलारा सांभाळत आहेत. येत्या 10 दिवसात संपुर्ण सदस्य भरले जावेत.
2) MPSC आणि महाआईटी च्या रखडलेल्या सर्व परीक्षा लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल लावावीत
3) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या 3600 विद्यार्थ्यांच्या मुलाखती लवकरात लवकर घ्याव्यात
4) रखडलेल्या 413 अधिकाऱ्यांना नियुक्त्या
द्याव्यात.
5)राज्य सरकारच्या वर्ग 3 व 4 च्या सर्व परीक्षा खाजगी कंपनीकडून न घेता, MPSC मार्फतच घ्याव्यात.तसेच कंत्राटी पद्धत रद्द करून पूर्णवेळ नोकऱ्या द्याव्यात.
6) मागील 3 वर्षांपासून पोलीस भरती झालीच नाही. येत्या 10 दिवसात पोलीस भरतीची अधिसूचना जारी करावी.
7)येत्या 10 दिवसात सरळसेवा व मेगाभारती साठी अधिसूचना जारी करावी.
8)कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे दोन वर्षे फुकट गेले त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा संपू शकते त्यासाठी वयोमर्यादेत 2 वर्षाची वाढ करावी व लवकर यासंबंधीचा शासन आदेश काढावा.
9)’महाआईटी’ या सरकारी कंपनी वर SIT लावावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
