शिंदोला ते साखरा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी – विजय पिदूरकर याची मागणी,मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वणी : नितेश ताजणे

तालुक्यातील शिंदोला ते साखरा,जुगाद गावाला जोडणारा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. त्यात पावसाचे पाणी साचून त्याला डबक्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहे. परिणामी रस्ता दुरुस्ती करण्याकरिता वारंवार निवेदनाद्वारे पाठपुरावा करून देखील रस्ता दुरुस्त होत नाही. म्हणून विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 जुलै 2021 ला दुपारी 1 वाजता दरम्यान उपविभागीय अधिकारी व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांना निवेदन देण्यात आले.
शिंदोला ते साखरा हा रस्ता नेमीच वर्दळीचा राहिला आहे.याच रस्त्यावर कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या परिसरातील 30 ते 35 गावातील लोक उपचाराकरीता त्यात गरोदर माता,लहान बालके,वृध्द नागरिक यांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.शिंदोला येते बँक व मुख्य बाजारपेठ परिसरातील असल्याने माथोली, जुगाद,साखरा, कोलगाव, मुंगोली, शिवणी, चिखली, टाकळी,येणक,हनुमान नगर, शेवाळा,या गावांच्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी, ऑटो, बस, चारचाकी वाहनातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी येनाडी गावाजवळील छोट्या पुलावर अपघात होऊन अपंगत्व झाले आहे.
वरील रस्त्यावरील खड्ड्यामुळे प्रवासाच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय धोकादायक आहे.वरील बाबीचे गांभीर्य व मानवी जीवाचे महत्त्व लक्षात घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतूक सुरळीत करावी.वरील रस्ता द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती योजनेत मंजूर असून वाहतूक योग्य दुरुस्ती करून समस्या सोडवावी.त्वरित रस्ता दुरुस्त न झाल्यास न्याय मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे विजय पिदूरकर यांनी देण्यात आलेल्या निवेदनात व्यक्त आहे.
निवेदन देते वेळी राजूभाऊ, दातारकर,विश्वास बोरपे,सुनील माथुलकर,निखिल उपासे,गणेश मत्ते आदी उपस्थित होते.