
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर(9529256225)
शासनाने यावर्षी ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पीकपेरा नोंदविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मात्र, ही प्रक्रिया किचकट ठरत असून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढविणारी आहे. ई-पीक पाहणीत विविध स्वरूपातील अडचणी निर्माण झाल्या असून त्या तात्काळ दूर करण्यात याव्यात, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी कृषी विभागाला दिले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनेक शेतकऱ्यांकडे आजही अॅन्ड्रॉइड मोबाईल नाहीत. ग्रामीण भागात पुरेशा गतीने मोबाईल नेटवर्क मिळत नाही. बहुतांश शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता सुध्दा येत नाही. त्यामुळे ई-पीक पाहणी प्रक्रियेचा बोजवारा उडवायचा नसेल तर शासनाने प्रत्येक गावाची जबाबदारी त्या-त्या गावच्या कृषी सहायकावर निश्चित करायला हवी. शासनाने सर्व जबाबदारी शेतक-यांवर दिल्याने त्रुटी राहण्याची शक्यता अधिक असून त्याचा त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या त्वरित निकाली काढाव्यात तसेच तलाठी व कृषी सहाय्यकांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी दिले आहे.
शेतक-यांच्या तक्रारी
पीक पेरा ई-पीक नोंदणीद्वारे करण्याचे शासनाने आदेश काढल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांनी खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे तक्रार करुन न्याय देण्याची मागणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे अॅन्ड्रॉइड मोबाइल नसल्याने तसेच या पद्धतीचा मोबाइल हाताळता येत नसल्याने शेतकरी वैतागले आहे. शेतकरी अनेक योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने खासदार भावनाताई गवळी यांनी जिल्हा कृषी अधिक्षकांना ई पीक पाहणी ॲप मधील अडचणी दुर करण्याचे निर्देश दिले आहे.
