
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा या गावातील शेतकरी नामदेव गराटे यांच्यावर वाघाने हल्ला केला. ही घटना आज दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी दीड वाजता घडली. मागील दोन दिवसापूर्वी वरोरा तालुक्यातीलच मोखाडा या गावात विहिरीतील वाघाचा थरार नागरिकांनी अनुभवला होता. त्याच्या दोन दिवसानंतरच मनुष्यावर वाघाच्या हल्ल्याची घटना घडली. सलग दोन घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वाघाप्रती रोष निर्माण झालेला आहे. वनविभागाने नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा वन विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून देण्यात आलेला आहे.
