
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
एकीकडे यवतमाळ व इतर ही जिल्ह्यात तुरीचे पीक संकटात सापडले आहे. अनेकांच्या शेतातील उभी तूर वाळली आहे. मात्र, कळंब तालुक्यातील उमरी या गावातील शेतकऱ्याने आपल्या कष्टातून तुरीचे शिवार फुलविले. त्यांना एकरी १८ ते २० क्विंटल उत्पन्न येण्याची आशा आहे.
अजय माधवराव नंदूरकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या जिल्ह्याभरातच तुरीचे पीक अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावात सापडले आहे. उभी तूर वाळत असल्याने शेतकऱ्यांनी त्यात गुरे-ढोरे सोडली.मात्र, उमरी येथील अजय नंदूरकर त्याला अफवाद ठरले आहे. त्यांनी शेतजमिनीचे योग्य परीक्षण करून अचूक वेळी तुरीची आपल्या पाच एकरात लागवड केली. २५ मे २०२१ रोजी ही लागवड त्यांनी आटोपली. तुरीचे एकही झाड वाळले किंवा मेले नाही. सदर तूर गावरान जातीचे असून, तिला छान चव आहे. याबाबत बोलताना नंदूरकर म्हणाले की, मला यंदा एकरी १८ ते २० क्विंटल उत्पन्न येईल, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. शेंगांनी तुरीचे प्रत्येक झाड लदबदून गेले असून, नंदूरकर यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे.
जमिनीचे योग्य मूल्यमापन हवे :नंदूरकर
शेतजमिनीचे शेतकऱ्याला योग्य मूल्यमापन करता आले पाहिजे. सोबतच लागवडीची अचूक वेळ साधने महत्त्वाचे असते. मी तूर पीक घेताना नवतंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही तूर चांगलीच बहरली. यापूर्वी एकरी सव्वा लाखाचे उत्पन्न घेतले. यंदा सोयाबीन व तुरीत डवरणी केली नाही. तूर फुलावर आल्यापासून शेंगा लागेपर्यंत १२ दिवसाच्या अंतराने कीटकनाशक फवारणी केली. सोयाबीनचे कुटार जाळून रोज रात्री शेतात धूर केला. या धुरामुळेच रोगांचा प्रादुर्भाव टळल्याची माहिती शेतकरी अजय नंदूरकर यांनी दिली.
