निर्बंध आणखी कडक होऊ शकतात राजेश टोपे यांची माहिती

  • Post author:
  • Post category:इतर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

महाराष्ट्रातील कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, तर मुंबईतील संसर्गाचा दर चार टक्के इतका असून मुंबईच्या दृष्टीने ही बाब खूपच चिंतेची असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.

 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, रुग्ण सापडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईसह राज्यातील निर्बंध कठोर केले जाऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य खाते आणि टास्क फोर्स यांची आज किंवा उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आठवड्याभरापूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला राज्यात कोरोनाचे ६ हजार सक्रिय रुग्ण होते. २८ तारखेला ही संख्या ११ हजार ४९२ वर पोहोचली. सायंकाळी ही संख्या २० हजारांपर्यंत जाऊ शकते. मुंबईत आठवडाभरापूर्वी ३०० रुग्ण आढळले होते. ती संख्या अलीकडे १३०० पर्यंत पोहोचली. संध्याकाळी ही संख्या २२०० पर्यंत जाऊ शकते. दोन दिवसांत संख्या दुप्पट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४००-५०० वरून बुधवारी दोन हजारांच्या पुढे असू शकेल. ही नक्कीच चिंताजनक बाब असल्याचे टोपे म्हणाले.