
‘किल्ला’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्षपूर्ण व प्रेरणादायी इतिहास. महाराष्ट्रात जवळपास ३५० किल्ले आहेत. त्यातील अनेक किल्ले महाराजांनी शत्रुना परास्त करून घेतले आहेत. तर काही किल्ल्यांची हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने पुनर्बांधणी केली आहे. महाराजांनी स्वतः आखणी करून १२ किल्ल्यांची बांधणी केली. महाराजांचे बरेच किल्ले डोंगरावर तर काही जलदुर्ग आहे. मात्र अलीकडे किल्ल्यांचा इतिहास तरुणाई विसरत जात आहे. मात्र याला अपवाद आहे नागपूर जिल्ह्यातील नरखेड मधील लोहारी सावंगा गावातील तरुणाई.
नुकतीच महाराजांची जयंती संपूर्ण जगभर साजरी झाली.विविध ठिकाणी ढोल,ताशे व रॅली निघाल्या.मात्र शिवरायांचा इतिहास जागृत करण्यासाठी ‘लोहारी सावंगा’ येथील युवकांनी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्याकरिता “शिवकालीन किल्ला निर्मिती” करण्याची किमया साधली. गावातील विद्यार्थ्यांनी आंतरजाल, इतिहासाचे पुस्तके व ऐतिहासिक साहित्याचा वापर करीत चिकित्सक दृष्टीने व बारकाईने अभ्यास करित किल्ले उभारले.
सिंधुदुर्ग, शिवनेरी,सिंहगड व जंजिरा प्रत्येक्षात बघत असल्याची भावना प्रथमदर्शनी झाली. हे चार किल्ले गावातील चार भागात छत्रपती रामनगर संघटना, जागृकता युवा संघटना, पंचशिल मानव कल्याण बौद्ध विहार कमिटी व शिवराज्य युवा सेवा संघटना या चार संघटनेच्या युवकांनी उभारले.
युवकांनी आयुष्यात प्रत्येक्षात किल्ले बघितले नसले तरी महाराजांवर असलेली श्रद्धा व कृतीतून अभिवादन करण्याचा दृढनिश्चयातून अप्रतिम कौशल्यपूर्ण निर्मिती केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाख्यानाजोगा होता.युवकांचे कौतुक करतांना त्यांची छाती अभिमानाने फुगत होती.त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज झळकत होते.
युवकांनी इको फ्रेंडली संकल्पना राबवित निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा वापर केला. अल्पदरात कुशल कारागिराप्रमाणे दगड, गेरू, रंग,चुना,रेती इत्यादीचा वापर करून ऐतिहासिक किल्ल्यांची अतिशय बारकाईने निर्मिती केली.
ग्रामस्थांनी युवकाचे भरभरून शाब्दिक कौतुक तर केलेच व प्रोत्साहन म्हणून ‘रोख पारितोषिक’ दिले.
“शेर शिवाजी संघटना” तर्फे युवकांचा ‘वृक्ष,मानपत्र व सन्मानचिन्ह’ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी शेर शिवाजी संघटनेचे संस्थापक सागरदादा राऊत, अध्यक्ष भूषणजी पुंड, संघटनेचे नरखेड तालुका अध्यक्ष स्वप्नील राऊत, प्रामुख्याने उपस्थित होते.
अशा प्रकारच्या उपक्रमातून महाराजांच्या कार्य,कर्तृत्व व इतिहासाला उजाळा मिळत असतो.शिवसंस्कृती समाजात रुजण्याकरिता लोहारी सावंगा येथील युवकवर्ग कृतीद्वारे प्रयत्न करीत आहे.त्या युवकांच्या कल्पकतेला, परिश्रमाला,प्रामाणिक प्रयत्नाला व सृजनशीलतेला मानाचा मुजरा.
- ✍🏻राजेंद्र रामहरी टेकाडे
काटोल जि.नागपूर
