
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते तथा सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रसर असणारे राजकुमार तागडे यांनी “राजगृह” या त्यांच्या निवासस्थानी सुंदर अशा निर्माण केलेल्या बुद्धविहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
दिनांक १४ मे २०२६ गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता झाडगाव येथील उपासक व उपासिका यांच्या द्वारे धम्माला अनुसरून विधिवत त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आल्यानंतर करुणामय बुद्धमूर्तीचा अनावरण सोहळा, अमरावती येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय चंरणदासजी इंगोले यांच्या हस्ते पार पडला.
या मंगलमय सोहळ्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतरावजी पुरके सर हे आवर्जून उपस्थित राहिलेत.
राजकुमार तागडे यांच्या ‘राजगृह’ या ठिकाणी मोठ्या धम्ममय आनंददायी वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा व तालुक्यातील साहित्यिक, शैक्षणिक तथा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी अतिशय स्नेहपूर्वक आपली बुद्धमूर्ती अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविल्याबद्दल राजकुमार तागडे परिवाराच्या वतीने या सर्वांचे अतिशय मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
